भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत विराट कोहलीनं 'सुपरकॅच' घेतल्याचे पाहायला मिळाले. कोहलीने वेस्ट इंडिजच्या शिमरोन हेटमारचा अफलातून झेल घेतला आणि साऱ्यांनाच धक्का बसला. कारण हा झेल कोणी पकडेल असे, वाटले नव्हते. पण कोहलीने हा झेल पकडला. या झेलनंतर सर्वांनीच कोहलीचे कौतुक केले. पण या झेलबाबत कोहलीने मोठा खुलासा केला आहे.
शिमरोन हेटमारयने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात चांगलीच फटकेबाजी केली. त्यानं रवींद्र जडेजाच्या एका षटकात सलग दोन षटकार खेचले, परंतु तिसरा षटकार खेचण्याच्या नादात तो झेल देऊन माघारी परतला. विराटनं सुपर डाईव्ह मारताना त्याचा अप्रतिम झेल टिपला. हेटमायर 14 चेंडूंत 3 षटकारांसह 23 धावा करून माघारी परतला. भारताला हा सामना गमवावा लागला.
सामना संपल्यावर कोहलीला या झेलबाबत विचारण्यात आले. त्यावेळी कोहली म्हणाला की, " जेव्हा चेंडू हातामध्ये फसतो तेव्हा असे झेल घेतले जातात. मी चेंडूला बघत होतो. जेव्हा चेंडू जवळ आला तेव्हा मी हात पुढे केले. माझं नशिब बलवत्तर होतं, त्यामुळे मला हा झेल पकडता आला."
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. शिवम दुबेनं पहिलं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील अर्धशतक झळकावताना आजचा दिवस गाजवला आणि त्यामुळे भारताला समाधानकारक पल्ला गाठता आला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा योग्य अंदाज बांधताना भारताच्या धावगतीवर वेसण घातले. विंडीजच्या केस्रीक विलियम्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारताने 20 षटकांत 7 बाद 170 धावांपर्यंत मजल मारली. शिवमने 30 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 54 धावा चोपल्या.
लेंडल सिमन्स आणि एव्हिन लुइस यांनी संयमी खेळ केला. त्यांना नशीबाचीही साथ लाभली. पाचव्या षटकात सिमन्सचा झेल वॉशिंग्टन सुंदरनं सोडला. भुवनेश्वर कुमारच्या त्याच षटकात लुइसचा झेल रिषभ पंतकडून सुटला. हा झेल थोडासा अवघड होता, परंतु रिषभनं पुरेपूर प्रयत्न केले. विंडीजनं पहिल्या पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 41 धावा केल्या. त्यानंतर दोघांनी फटकेबाजी केली. वॉशिंग्टन सुंदरच्या अखेरच्या षटकात भारताला यश मिळालं. 10व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रिषभ पंतनं विंडीजच्या लुइसला यष्टिचीत केले. लुइस 35 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचून 40 धावांत तंबूत परतला.