फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिज : दुसरा ट्वेंटी-20 सामना पावसामुळे रद्द झाल्यानं डकवर्थ लुईसनुसार भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आले. भारताच्या 5 बाद 167 धावांचा पाठलाग करताना विंडीजनं 15.3 षटकांत 4 बाद 98 धावा केल्या होत्या. पण, पावसाच्या व्यत्ययामुळे पुढील खेळ झालाच नाही आणि भारताने डकवर्थ लुईसनुसार 22 धावांनी विजय निश्चित केला. या विजयासह भारताने तीन ट्वेंटी-20 मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या सामन्यात रोहित शर्मानं ( 67) अर्धशतकी खेळी करत अनेक विक्रम मोडले, तर कृणाला पांड्यानं 23 धावांत 2 विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. पण, या सामन्यात कॅप्टन कोहलीनं भारताकडून ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा विक्रम स्वतःच्या नावावर केला.
या सामन्यात कोहलीनं 23 चेंडूंत 28 धावा केल्या. या खेळीसह त्यानं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 8392 धावांचा सुरेश रैनाचा विक्रम मोडला. कोहलीनं 254 डावांत 8416 धावा झाल्या आहेत आणि जगभरातील ट्वेंटी-20 क्रिकेटपटूंमध्ये त्यानं सहावे स्थान पटकावले आहे. या विक्रमात ख्रिस गेल ( 12808 धावा) अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर ब्रेंडन मॅकलम ( 9922), किरॉन पोलार्ड ( 9373), डेव्हिड वॉर्नर ( 8803) आणि शोएब मलिक ( 8701) यांचा क्रमांक येतो. भारतीय फलंदाजांत रोहित शर्मा ( 8291) आणि शिखर धवन ( 6953) यांचा क्रमांक येतो.
कोहलीच्या 8416 धावांमध्ये 5412 धावा या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी केलेल्या आहेत. भारतीय संघासाठी 2310 धावा आहेत आणि अन्य 694 धावा या दिल्लीकडून केलेल्या आहेत. ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा 2422 धावांसह अव्वल स्थानावर आहे, तर कोहली 2310 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
रोहितनं मोडला 'युनिव्हर्सल बॉस' गेलचा विश्वविक्रम!या सामन्यात भारताचा सलामीवीर रोहित शर्माने 67 धावांची खेळी केली. रोहितने 51 चेंडूंत 6 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 67 धावांची खेळी साकारली. रोहितनं या खेळीच्या जोरावर युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडला. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 105 षटकारांचा गेलचा विक्रम रोहितनं काल मोडला.
ट्वेंटी-20 सर्वाधिक षटकार107 - रोहित शर्मा ( भारत) 105 - ख्रिस गेल ( वेस्ट इंडिज) 103 - मार्टिन गुप्तील ( न्यूझीलंड) 92 - कॉलिन मुन्रो ( न्यूझीलंड ) 91 - ब्रेंडन मॅकलम ( न्यूझीलंड )