मुंबई, भारत वि. वेस्ट इंडिज : वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कर्णधार विराट कोहलीनं प्रथमच पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यानं संघातील दुफळी झाल्याच्या मुद्यावर सडेतोड उत्तर देताना या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले. पण, त्याचवेळी त्यानं भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी कोण हवंय, हेही सांगितले. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) मुख्य प्रशिक्षकपदासह अन्य महत्त्वाच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यामुळे रवी शास्त्री यांचे पद जाणार अशी चर्चा आहे. पण, कोहलीनं त्याच्या आणि संघाच्या 'मन की बात' सांगितली.
भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघ आज रवाना होणार आहे. 3 ऑगस्टपासून ट्वेंटी-20नं या दौऱ्याला सुरुवात होईल. पहिले दोन सामने फ्लोरिडा येथे खेळवण्यात येतील, तर तिसरा सामना गयाना येथे होईल. त्यानंतर तीन वन डे आणि दोन कसोटी सामनेही होणार आहेत. ट्वेंटी-20 मालिकेसाठी कॅप्टन विराट कोहली उत्साही आहे. या दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकारपरिषद घेतली.
कोहली म्हणाला,'' रवी शास्त्रीच प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास मला आणि संघाला आनंद होईल. क्रिकेट सल्लागार समितीनं याबाबत माझ्याकडे मत मागितलेले नाही आणि ही प्रक्रिया कशी पार पाडेल, हेही मला माहीत नाही. पण, सल्लागार समितीनं माझं मत विचारल्यास, मी त्यांच्याशी चर्चा करीन. शास्त्रींसोबत संघ चांगली कामगिरी करत आहे आणि आम्ही एकमेकांचा आदर करतो. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला आवडेल.''
टीम इंडियातील दुफळीवर प्रथमच कॅप्टन कोहलीनं मांडलं मत, म्हणाला...या परिषदेत कोहली वर्ल्ड कपनंतर सुरु झालेल्या रोहित शर्मा सोबतच्या वादांच्या चर्चांवर काय मत व्यक्त करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि कोहलीनं त्याचे उत्तर दिलं. कोहली म्हणाला,'' मी पण खूप काही ऐकले आहे. पण, संघात तसं काहीच नाही. जर ड्रेसिंग रुमचे वातावरणं चांगले नसते तर मागील दोन वर्षांत संघाची कामगिरीचा आलेख चढा राहिला नसता. त्यामुळे संघात वाद नाही. ऑल इज वेल... अशा चर्चा येणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे. अशा चर्चा होणे दुर्दैवी आहे. ड्रेसिंग रुमचं वातावरणं कसं आहे हे तुम्ही स्वतः येऊ पाहा. कुलदीप यादव असो किंवा महेंद्रसिंग धोनी यांच्यासोबतचे संबंध किती खेळीमेळीचे आहे, हे तुम्ही पाहा.''
'' या बातम्या पेरल्या जात आहे. याचा कोणाला फायदा होतोय हे मलाच कळत नाहीय... गेल्या चार वर्ष आम्ही संघाला 7 व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आणले, संघात दुफळी असती तर हे शक्य झाले असते का?,'' असेही विराटनं विचारलं.