मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. हा विश्वविक्रम रचताना कोहलीने सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोन्ही माजी महान खेळाडूंना मागे टाकले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीने अर्धशतक झळकावले. या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. कारण बाद झालेल्या भारताच्या तिन्ही फलंदाजांना अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे या अर्धशतकाबरोबर कोहलीने नवा विश्वविक्रम रचला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कोहलीनं वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करण्याचा विक्रम नावावर केला होता. आता त्याला सर्वात जलद 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम नावावर करून सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या महान फलंदाजांना मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा कोहली जगातील बारावा, तर तेंडुलकर ( 34357) आणि राहुल द्रविड ( 24208) यांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीच्या नावावर वन डेत 11020, कसोटीत 6613 आणि ट्वेंटी-20 2263 धावा आहेत.
तेंडुलकर आणि लारा यांनी सर्वात कमी म्हणजे 453 डावांत 20 हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 415 डाव ( 131 कसोटी, 222 वन डे आणि 62 ट्वेंटी-20) फलंदाजी केली आहे. त्यात त्याच्या नावावर 19896 धावा होत्या. तेंडुलकर आणि लारा यांच्यानंतर या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंगचा ( 468) नंबर येतो. पण आता कोहली या यादीमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे, कारण २० हजार आंतरराष्ट्रीय धावा ४१६ सामन्यांमध्ये पूर्ण केल्या आहेत.
तत्पूर्वी, विराटने वन डे क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराटने केवळ 222 डावांत 11 हजार धावा पूर्ण केल्या. त्याबरोबरच तो सर्वात वेगाने 11 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला आहे. विराट हा सर्वात कमी म्हणजे 222 डावांत 11 हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने 276 डावांत 11 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्याबरोबरच 11 वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. वन डे क्रिकेटमध्ये 11000 धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हा पल्ला पार केला आहे.
Web Title: India vs West Indies: Virat Kohli's new world record; Sachin and Lara left behind the legends
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.