मुंबई , भारत वि. वेस्ट इंडीज : इंग्लंड मालिकेत भारतीय फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नव्हती आणि हीच बाब वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते. 4 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत यजमान भारताचे पारडे जड वाटत असले तरी वेस्ट इंडीजची कामगिरी विराट सेनेची चिंता वाढवणारी आहे. जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली खेळणारा विंडिज संघ काही बाबतीत भारतीय संघापेक्षा वरचढ ठरत आहे.
यंदाच्या वर्षात वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे आणि हाच भारताला धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे आघाडीच्या फळीला पुन्हा अपयश आल्यास भारतीय संघ अडचणीत येऊ शकतो. 2018 मध्ये झालेल्या पाच सामन्यांत वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी 18.04च्या सरासरीने धावा दिल्या आहेत. दुसरीकडे भारताच्या गोलंदाजांनी मागील पाच सामन्यांत 25.25 च्या सरासरीने धावा दिल्या आहेत. या आकडेवारीत वेस्ट इंडीज अव्वल स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका ( 23.72) , पाकिस्तान ( 24.22) आणि श्रीलंका ( 24.33) हे संघ भारताच्या पुढे आहेत.
भारतीय संघाने जलदगती गोलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर सामने खेळले आहेत आणि त्यात त्यांच्याकडून चांगली कामगिरीही झाली आहे. मात्र, आकड्यांवर लक्ष टाकल्यास वेस्ट इंडीजचे गोलंदाज सरस ठरतात. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांनी 5 सामन्यांत 16.95 च्या सरासरीने 84 विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे भारताने 2018 मध्ये खेळलेल्या 9 सामन्यांत 25.05 च्या सरासरीने 119 विकेट घेतल्या आहेत. याही आकडेवारीत वेस्ट इंडीजचा संघ अव्वल स्थानावर आहे.