मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा निर्णायक सामना वानखेडे मैदानावर होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्यांना ट्वेन्टी-२० मालिका जिंकता येणार आहे. या महत्वाच्या सामन्यापूर्वी एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे वेस्ट इंडिजने वानखेडेवर एकही ट्वेन्टी-२० सामना गमावलेला नाही. दुसराकडे या मैदानात भारताची कामगिरी आतापर्यंत चांगली झालेली नाही.
वेस्ट इंडिजने आतापर्यंत वानखेडेवर दोन ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. वेस्ट इंडिजने पहिला ट्वेन्टी-२० सामना २०१६ साली झालेल्या विश्वचषकात इंग्लंडबरोबर पहिला सामना येथे खेळला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजने सहा विकेट्स राखून विजय मिळवला होता.
वानखेडेवर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी रंगली होती. या सामन्यात वेस्ट इंडिजने सात विकेट्स राखून विजय मिळवला होता. या विजयासह वेस्ट इंडिजने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान पटकावले होते.
भारतीय संघाने वानखेडेवर तीन ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. या तीन ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये भारताला फक्त एकच विजय मिळवता आला आहे. भारताला वानखेडेवरील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात इंग्लंडने पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताला वेस्ट इंडिजने ट्वेन्टी-२० विश्वचषकात पराभूत केले होते. पण २४ डिसेंबर २०१७ साली झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेवर पाच विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यामुळे वानखेडेवरची आकडेवारी पाहिली तर भारतापेक्षा वेस्ट इंडिजचेच पारडे जड दिसत आहे.