भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजनं विजयासाठी ठेवलेलं 208 धावांचा लक्ष्य टीम इंडियानं 6 विकेट्स व 8 चेंडू राखून पार केलं. लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार विराट कोहलीनं तुफान फटकेबाजी करताना नाबाद 94 धावा चोपून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात विराटनं अजब सेलिब्रेशन केलं आणि याबाबत विंडीज कर्णधार किरॉन पोलार्ड भडकला. त्यानं विराटवर टीका केली.
वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 207 धावा केल्या. एव्हिन लुईसनं 17 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 40 धावांची खेळी केली. त्यानंतर ब्रेंडन किंग ( 31), शिमरोन हेटमायर ( 56) आणि किरॉन पोलार्ड ( 37) यांनी फटकेबाजी केली. जेसन होल्डरनही 9 चेंडूंत 24 धावा चोपल्या. युजवेंद्र चहलनं एकाच षटकात दोन धक्के देत विंडीजच्या धावगतीला चाप बसवला.
त्यानंतर टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा (8) लगेच माघारी परतला. पण, राहुल व विराट यांनी शतकी भागीदारी केली. राहुलनं 40 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकार खेचून 62 धावा केल्या. त्यानंतर विराटनं सर्व सूत्र आपल्या हाती घेताना विंडीजच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यानं 50 चेंडूंत 6 चौकार व 6 षटकार खेचून नाबाद 94 धावा चोपल्या. भारतीय संघानं हा सामना 6 विकेट राखून जिंकला.
विराटनं डावाच्या 16व्या षटकात केस्रीक विलियम्सच्या गोलंदाजीवर षटकार खेचला अन् सेलिब्रेशन केलं. त्याबाबत पोलार्डला विचारले असता तो म्हणाला,''विराट अॅनिमेटेड पात्र आहे. तो दिग्गज फलंदाज आहे आणि त्यानं पुन्हा एकदा आपल्या खेळीतून तो जगातला सर्वोत्तम खेळाडू आहे, हे दाखवून दिलं. तो नकल करत होता किंवा आणखी काही, पण हाही खेळाचा भाग आहे.''