कोलकाता : सर्व आघाड्यांवर यशस्वी कामगिरी करणारा भारतीय संघ शुक्रवारी वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या सामन्यात विजयासह वन डे पाठोपाठ टी-२० मालिका जिंकण्यास सज्ज झाला आहे. काल पहिल्या सामन्यात अवघ्या १७ धावा काढून परतलेला विराट कोहली ईडनवर मोठी खेळी करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा वाटते.
दौऱ्यावर आल्यापासून विंडीजने अद्याप अपेक्षित कामगिरी केलेली नाही. सुरुवातीला तीन वन डे आणि नंतर पहिल्या टी-२० लढतीत विजय मिळविण्यासाठी भारताला फारसे परिश्रम घेण्याची गरज भासली नाही. मायदेशात इंग्लंडवर ३-२ असा विजय नोंदवून येथे आलेल्या किरोन पोलार्डच्या नेतृत्वाखालील संघाने किमान अखेरचे दोन टी-२० सामने जिंकण्यासाठी भारताला आव्हान द्यावे, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा असेल. बुधवारचा पहिला सामना भारताने सहा गडी राखून सहज जिंकला. भारताने ही मालिका जिंकल्यास नियमित कर्णधारपदी नियुक्त झालेल्या रोहितच्या नेतृत्वात हा सलग तिसरा मालिका विजय ठरेल.
वेगवान गोलंदाज अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला संधी देत भारत सामन्यात सहा खेळाडूंसह उतरला होता. त्यामुळे फॉर्ममध्ये असलेल्या श्रेयस अय्यरला मात्र बाहेर बसावे लागले. विश्वचषकासाठी अष्टपैलू खेळाडूचा शोध घेणे अनिवार्य असल्यामुळे असे पाऊल उचलण्यात आले असावे. पोलार्डच्या संघासाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असा असेल. जखमेमुळे पहिल्या सामन्याला मुकलेला जेसन होल्डर आज खेळू शकतो. निकोलस पूरन, काइल मायर्स यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. होल्डर- पूरन- पोलार्ड या त्रिकुटाच्या बळावर विंडीज संघ पराभवाची मालिका मोडीत काढण्यास इच्छुक आहे.
भारतीय संघाच्या एकमेव चिंतेचा विषय असेल तो विराटचा फॉर्म. वेस्ट इंडीजविरुद्ध विराटने या मालिकेत क्रमश: ८,१८,००,१७ आशा धावा केल्या. त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित आहे. पॉवर प्लेमधील आक्रमक फटकेबाजीचे महत्त्व रोहितला मात्र चांगलेच कळले. त्याने पहिल्या सामन्यात १९ चेंडूत ४० धावा ठोकल्या. ओडियन स्मिथच्या सहा चेंडूंवर २२ धावा वसूल केल्या. दुसरा सलामीवीर ईशान किशन याला मात्र धावांसाठी झुंजावे लागले. कोहलीकडे फटकेबाजीची संधी होती. मात्र, तो १३ चेंडूत १७ धावा काढू शकला. १५ कोटी २५ लाख रुपयांसह आयपीएल लिलावात महागडा ठरलेला ईशान मोकळेपणाने खेळला नाही. एकेक धावा घेण्यासाठी तो धडपडत होता.
संघ यातून निवडणारभारत : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड़, दीपक हुड्डा, कुलदीप यादव आणि हरप्रीत ब्रार.
वेस्ट इंडिज : कीरोन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन, फॅबियन एलेन, डेरेन ब्रावो, रोस्टन चेज, शेल्डन कॉटरेल, डोमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसेन, ब्रेंडन किंग, रोवमॅन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, काइल मायर्स आणि हेडन वॉल्श ज्युनियर.
फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न केला -बिश्नोई
‘आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पदार्पण करून आनंदित आहे. पहिल्याच सामन्यात मी यष्ट्यांवर मारा करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना फटकेबाजीची फारशी संधी न देण्याचा माझा प्रयत्न होता,’ अशी प्रतिक्रिया भारताचा युवा फिरकीपटू रवी बिश्नोई याने दिली. बिश्नोईने बुधवारी झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडीजविरुद्ध ४ षटकांत केवळ १७ धावा देत २ बळी घेतले. युझवेंद्र चहलसोबत बीसीसीआय टीव्हीवर चर्चा करताना बिश्नोई म्हणाला की, ‘अचूक रेषेत आणि लयीमध्ये मारा करण्याची माझी योजना होती. याजोरावर फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखण्याचा माझा विचार होता. जर त्यांना मोकळेपणे खेळण्याची संधी मिळाली असती, तर त्यांनी धावांचा डोंगर उभारला असता. टी-२० क्रिकेटमध्ये विंडीज फलंदाज सर्वोत्तम आहेत. त्यामुळे यष्टींवर मारा करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात माझ्याकडून ५-६ वाइड चेंडूही पडले.’ आपल्या पदार्पणाविषयी बिश्नोई म्हणाला की, ‘भारताकडून खेळण्याचे सर्वांचेच स्वप्न असते.