Join us  

India vs WI Match: "कोहली खराब फॉर्ममध्ये नाही; विराट टी-२० मालिकेत मोठी खेळी करेल"

‘विराट नेट्समध्ये चांगली फलंदाजी करीत आहे. तो टी-२० मालिकेत मोठी खेळी करेल, असा मला विश्वास वाटतो असं कोच राठोड म्हणाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 5:23 AM

Open in App

कोलकाता : ‘विराट कोहली धावा काढत नसला तरी भारतीय संघाचे फलंदाजी कोच विक्रम राठोड चिंतेत नाहीत. वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेत तो नक्की फॉर्ममध्ये येईल,’ असा आशावाद त्यांनी सोमवारी व्यक्त केला. मागच्या महिन्यात खेळाच्या तिन्ही प्रकारांतील नेतृत्व सोडल्यानंतर विंडीजविरुद्ध वन डे मालिकेत कोहलीने ८.६ च्या सरासरीने केवळ २६ धावा केल्या. 

ईडन गार्डनवर बुधवारपासून सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेआधी पत्रकारांनी याविषयी विचारताच राठोड म्हणाले, ‘कोहली नेट्समध्ये चांगली फलंदाजी करताना दिसतो. माझ्या मते तो ‘आउट ऑफ फॉर्म’ नाहीच.  विंडीजविरुद्ध वन डे मालिकेत तो धावा काढू शकला नाही; पण मी चिंताग्रस्त नाही.’ कोहलीने मागील दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय शतक ठोकलेले नाही.  नोव्हेंबर २०१९ ला त्याने बांगलादेशविरुद्ध अखेरचे शतक केले होते. 

राठोड म्हणाले, ‘विराट नेट्समध्ये चांगली फलंदाजी करीत आहे. तो टी-२० मालिकेत मोठी खेळी करेल, असा मला विश्वास वाटतो.  ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकात देखील आमचे फलंदाज यशस्वी ठरतील. फलंदाजीत कुठलीही समस्या नाही. विश्वचषकाच्या तयारीवर फोकस असून ऑस्ट्रेलियातील परिस्थितीत धावा काढण्यात सर्व खेळाडू सक्षम आहेत.’

ऋषभ मधल्या फळीत उपयुक्त ठरेल 

‘ऋषभ पंत हा फलंदाजीत मधल्या फळीत अधिक उपयुक्त ठरू शकतो. यष्टीरक्षक ऋषभला सलामीला पाठविण्याचा संघ व्यवस्थापनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही,’ असे विक्रम राठोड यांनी स्पष्ट केले. वन डे मालिकेतील एका सामन्यात ऋषभने सलामीला फलंदाजी केली होती. यावरून वाद उद्भवताच राठोड यांनी आक्रमक ऋषभला मधल्या फळीत खेळविणे आमच्या हितावह असेल,’ असे सांगितले.भविष्यात ऋषभ पंतकडून डावाची सुरुवात करून घेण्याचा विचार आहे काय, असे विचारताच राठोड म्हणाले, ‘ऋषभला मधल्या फळीतच खेळविले जाईल.  

२०२३ नंतर मी संघासोबत असेन की नाही हे मला माहिती नाही.  संघाच्या गरजेनुसार ऋषभला फलंदाजीसाठी पाठविले जाईल. आमच्याकडे तो एकमेव डावखुरा फलंदाज असेल.’ द. आफ्रिका दौऱ्यातील पराभवानंतर मधल्या फळीतील फलंदाजांच्या कुचकामीपणामुळे राठोड यांच्यावर बरीच टीका झाली होती. यावर भाष्य करताना ते म्हणाले, ‘टी-२० आणि वन डेत मधल्या फळीची कामगिरी हा चिंतेचा विषय नव्हताच. अहमदाबादमध्ये खेळपट्टी किचकट होती. सुरुवातीला गडी बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि  पंत यांनी मधल्याफळीत उपयुक्त योगदान दिले.’

टॅग्स :वेस्ट इंडिजभारतविराट कोहली
Open in App