हैदराबाद : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीत मुंबईकर शार्दूल ठाकूरला पदार्पणाची संधी मिळाली. मात्र, अवघे 10 चेंडू टाकून त्याला दुखापतीमुळे तंबूत परतावे लागले. बीसीसीआयाने नुकत्याच जाहीर केलेल्या निवेदनानुसार आजचा संपूर्ण दिवस तो खेळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
बीसीसीआयच्या माहितीनुसार,''शार्दूलच्या दुखापतीची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल. त्यामुळे तो आजचा संपूर्ण दिवस मैदानावर उतरणार नाही. उर्वरीत सामन्यात त्याच्या समावेशाबद्दलची माहिती नंतर देण्यात येईल.'' पृथ्वी शॉ पाठोपाठ मुंबईच्या शार्दुलने भारताच्या कसोटी संघात अखेर पदार्पण केले. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या शार्दुल कसोटीत पदार्पण करणारा २९४ वा खेळाडू आहे.
२०१६ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर शार्दूलला भारताच्या कसोटी संघात समाविष्ट केले होते, परंतु त्याला अंतिम संघात आज संधी मिळाली. मात्र, चौथ्या षटकाचा चौथा चेंडू टाकल्यानंतर शार्दूलला दुखापत झाली. त्यानंतर संघाचे फिजीओ पॅट्रीक फर्हर्ट हे मैदानावर आलले आणि त्यांनी शार्दूलला काही मिनिटांसाठी मैदानाबाहेर नेले. आर अश्विनने शार्दूलचे षटक पूर्ण केले.