त्रिवेंद्रम : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे सामन्यात भारतीय फलंदाज दमदार फटकेबाजी करत आहेत. त्यांच्या बॅटीतून धावांचा पाऊस पडत आहे. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या जोडीने तर विंडीज गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळे पाचव्या वन डे सामन्यातही या जोडीकडून तुफानी खेळीची अपेक्षा आहे. विक्रमांच्या बाबतीत भलेही कोहली हिटमॅनपेक्षा वरचढ ठरत असला तरी रोहितच्या एका विक्रमाच्या आसपासही कोहलीला पोहोचता आलेले नाही.
भारतीय संघ 2018 या वर्षातील अखेरचा वन डे सामना आज त्रिवेंद्रम येथे खेळणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 अशी आघाडी घेतली आहे आणि अखेरच्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याचा भारताचा निर्धार आहे. भारताने याआधी २०१५ मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावली होती. तेव्हापासून मायदेशात संघाची विजयी घोडदौड कायम आहे. विंडीजविरुद्ध शेवटचा सामना जिंकल्यास भारताचा हा सलग आठवा मालिका विजय ठरणार आहे.
( 2018 वर्षात सर्वाधिक षटकार खेचणारे भारतीय फलंदाज)
या सामन्यात रोहितला षटकारांचे द्विशतक झळकावण्याची संधी आहे. भारताकडून सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित दुसऱ्या क्रमांकावर आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी 218 षटकारांसह आघाडीवर आहे. मात्र, एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकारांचा भारतीयांचा विक्रम अजूनही रोहितच्या नावावर आहे. त्याने 2017 मध्ये 46 षटकार खेचले होते. 2018 मध्येही त्याच्या नावावर 35 षटकार आहेत, परंतु कोहलीने केवळ 13 षटकार खेचले आहेत.