त्रिवेंद्रम : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवा वन डे सामना आज त्रिवेंद्रम येथे खेळवण्यात येणार आहे. कर्णधार विराट कोहली आणि विक्रम हे समीकरण याही सामन्यात पाहायला मिळणार आहे. विंडीज मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत कोहलीने शतकं झळकावून विक्रम नावावर केला होता. सलग तीन वन डे सामन्यात शतक झळकावणारा तो पहिला भारतीय ठरला होता. त्यात मालिकेतील अखेरचा सामना सुरू होण्यापूर्वी एक विशेष विक्रम नावावर करण्याची संधी आहे. या सामन्यात तो 'टॉस का बॉस' ठरू शकतो.
भारतीय संघ नुकताच इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत कोहलीला एकदाही नाणेफेक जिंकता आली नव्हती. मात्र, विंडिजविरुद्धच्या चारही सामन्यात त्याने नाणेफेक जिंकलेली आहे. त्यात शेवटच्या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकल्यास विंडीजविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो तिसरा कर्णधार ठरेल. याआधी दक्षिण आफ्रिकेचा हँसी क्रोन्ये आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ यांनी अशी कामगिरी केली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरेल. अन्य संघांविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेबाबत बोलायचे झाल्यास मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनी यांनी यापूर्वीच हा विक्रम नावावर केला आहे. आज कोहलीने टॉस जिंकल्यास अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय कर्णधार ठरणार आहे.
Web Title: India vs WIN 5th ODI: Virat Kohli will create another record in fifth ODI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.