ZIM vs IND 3rd T20 Live Match Updates In Marathi | हरारे : झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेला भारतीय संघ आज तिसरा ट्वेंटी-२० सामना खेळत आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पाच सामन्यांची मालिका होत आहे. सलामीचा सामना यजमानांनी जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारताने मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे आजचा सामना जिंकून कोण मालिकेत आघाडी घेणार हे पाहण्याजोगे असेल. हरारे स्पोर्ट्स क्लब येथे हा सामना खेळवला जात आहे.
आजच्या सामन्यासाठी भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघासोबत गेलेल्या खेळाडूंना आजच्या सामन्यासाठी संधी मिळाली आहे. यामध्ये यष्टीरक्षक संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे यांचा समावेश आहे. यांना पहिल्या दोन सामन्यांमध्ये बाकावर बसावे लागले होते. यापैकी केवळ दुबेला विश्वचषकात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. मात्र, त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद.
दरम्यान, मालिकेतील पहिल्या सामन्यात ११५ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला अपयश आले. मग यजमान झिम्बाब्वेने विजयी सलामी दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताकडून अभिषेक शर्माने शतकी खेळी केली, त्याला ऋतुराज गायकवाडने चांगली साथ दिली. भारताने झिम्बाब्वेसमोर २३५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना यजमानांना घाम फुटला अन् १०० धावांनी सामना गमावला.