Join us  

चॅम्पियन्स ट्रॉफीसह दोन विश्वचषक आयोजनास भारत इच्छुक

आयसीसीचे काळजीवाहू सीईओ ज्योफ एलार्डिस म्हणाले, ‘क्रिकेटचा सर्वदूर प्रचार करण्याच्या हेतूने सदस्यांनी दिलेल्या प्रस्तावाचे स्वागत करतो. आर्थिक आणि सामाजिक लाभासाठीदेखील क्रिकेटचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरते. २०१७ ला इंग्लंडमध्ये आयोजन झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी बंद करण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 10:53 AM

Open in App

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने २०२४ ते २०३१ या पुढील आठ वर्षांसाठी भविष्यातील दौरा वेळापत्रक(एफटीपी) तयार केले असून भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसह प्रत्येकी एक वन डे आणि टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भूषविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आयसीसीने सोमवारी ही माहिती दिली.वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने मागच्या महिन्यात तीन विश्व स्पर्धेच्या आयोजनाची दावेदारी सादर करण्याचा निर्णय घेतला. २०२४ पासून सुरू होणाऱ्या या आयोजनातील कुठल्याही यजमानपदाचे शुल्क भरण्याची भारताची तयारी नाही. आयसीसी स्पर्धा आयोजनासाठी आपल्या सरकारकडून मिळणारी कर सवलत मिळविण्याची मोठी डोकेदुखी बीसीसीआयपुढे असेल. बीसीसीआयने यजमानपदाचा हा निर्णय मागच्या कार्यकारिणी बैठकी दरम्यान घेतला. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याचे यजमानपद, तसेच महिला आणि अंडर १९ स्पर्धांच्या यजमानपदाचा निर्णय या वर्षअखेर होईल. २०२४ ते २०३१ या कालावधीत पुरुषांचे दोन वन डे विश्वचषक, चार टी-२० विश्वचषक तसेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दोन स्पर्धांचे आयोजन होईल. या स्पर्धा संयुक्तपणे किंवा एकट्याच्या बळावर आयोजित करण्याची तयारी आहे काय, असा प्रस्ताव सदस्य देशांकडून मागितला होता.ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, मलेशिया, नामीबिया, न्यूझीलंड, ओमान, पाकिस्तान, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्टइंडीज, संयुक्त अरब अमिरात, अमेरिका आणि झिम्बाब्वे या देशांकडून प्रस्ताव मिळाले.

आयसीसीचे काळजीवाहू सीईओ ज्योफ एलार्डिस म्हणाले, ‘क्रिकेटचा सर्वदूर प्रचार करण्याच्या हेतूने सदस्यांनी दिलेल्या प्रस्तावाचे स्वागत करतो. आर्थिक आणि सामाजिक लाभासाठीदेखील क्रिकेटचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरते. २०१७ ला इंग्लंडमध्ये आयोजन झाल्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी बंद करण्यात आली होती. आयसीसीने पुन्हा सुरू करताच भारताने आयोजन करण्यास रुची दाखविली आहे.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघक्रिकेट सट्टेबाजी