लंडन : भारतात कसोटी मालिकेच्या निमित्ताने नुकतेच सात आठवडे बायोबबलमध्ये वास्तव्य करावे लागल्याने क्रिकेटचा तिरस्कार करू लागलो होतो, असा खुलासा इंग्लंडचा ऑफ स्पिनर डॉम बेस याने केला आहे. चार कसोटीसामन्यांच्या मालिकेत बेस दोन सामने खेळला. त्याने पाच गडी बाद केले होते. भारताने ही मालिका ३-१ ने जिंकली.
चेन्नईत पिहला कसोटी सामना जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजाविणारा बेस सध्या इंग्लिश एकादशमधून बाहेर झाला. अहमदाबादचञया चौथ्या कसोटीत त्याने संघात पुनरागमन केले खरे मात्र संघ डावाने पराभूत झाला. या सामन्यात बेसला एकही गडी बाद करता आला नव्हता. ३५ दिवस बायोबबलमध्ये वास्तव्य केल्यानंतर बेस सध्या यॉर्कशायरकडून खेळत आहे. क्रिकइन्फोशी बोलताना तो म्हणाला, ‘भारत दौऱ्यानंतर मी बऱ्यापैकी ब्रेक घेतला. क्रिकेटचा कंटाळा आला होता. मनावर दडपण आले होते. भारतातून परतल्यानंतर खेळापासून दूर राहणे माझ्यासाठी आवश्यक झाले होते.’
भारतातून परतल्यानंतर बेसने तीन आठवडे विश्रांती घेतली. यादरम्यान लीड्समध्ये स्वत:ची प्रेमिका आणि आवडत्या कुत्र्यासोबत वेळ घालविला. यामुळे मी ताजातवाना झालो, असे डोमचे मत आहे. ‘भारतात बायोबबलमध्ये केवळ अणि केवळ क्रिकेट होते. चांगली कामगिरी झाली तर ठीक आहे मात्र कामगिरी होत नसेल तर वेळ घालविणे अधिकच कंटाळवाणे असते. भारतात जे घडले ते मी सकारात्मक मानतो. पुढे काय करायचे याची योजना तयार आहे. भारत दौऱ्यातून जो बोध घेतला,त्यातून इंग्लंडचा दीर्घकालीन बलाढ्य संघ तयार करण्यास बळ मिळेल,’ असा विश्वास बेसने व्यक्त केला आहे.