भारतीय संघाने १९८३ साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली वन डे वर्ल्ड कप जिंकला. भारतीय संघाने तेव्हाचा दादा संघ वेस्ट इंडिजला फायनलमध्ये पराभूत करून लॉर्ड्सवर इतिहास घडविला. वेस्ट इंडिजला वर्ल्ड कप विजयाची हॅटट्रिक नोंदवण्याची संधी होती, परंतु कपिल देव अँड टीमने हा विजयरथ रोखला. त्यावेळी भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंतही जाईल अशी अपेक्षा कुणाला नव्हती, परंतु कपिल देवच्या संघाने सर्वांना चुकीचे ठरवले.
भारताच्या गटात वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे होते. प्रत्येक संघ एकमेकांशी दोन सामने खेळले आणि त्यानंतर उपांत्य फेरीचे संघ ठरले. मागील दोन वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक झाली होती आणि ८३ मध्ये पहिल्याच सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजला पराभूत केले. १९७५ च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर विंडीजला प्रथमच हार मानावी लागली होती. दुसऱ्या सामन्यात भारताला विंडीजने पराभूत केले, परंतु ऑस्ट्रेलिया व झिम्बाब्वे यांच्यावर विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीत स्थान पटकावले. उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध मॅच झाली.
फायनलमध्ये पुन्हा वेस्ट इंडिज समोर आले अन् भारत जिंकेल असे कुणालाही वाटले नव्हते. भारताच्या १८३ धावांचा पाठलाग करताना विंडीजकडे देस्मोंड हायनेस, गॉर्डन ग्रिनिज, क्लाईव्ह लॉईड आणि व्हीव्ह रिचर्ड ही मजबूत फळी होती. मात्र, कपिल देव यांनी टिपलेल्या एका कॅचने मॅच फिरली अन् भारताने ट्रॉफी उंचावली. ''होय आम्ही भारताकडून हरलो. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, हे सर्वांना माहित्येय. तुम्ही जिंकला आणि तुम्ही कधी हरताही. आम्ही पराभवाचा सामना करण्यासाठीही सज्ज असतो. आम्हाला जिंकायचे असते, परंतु ते प्रामाणिकपणे. १९८३ पर्यंत आम्ही एकही मॅच गमावलेली नव्हती अन् १९८३ मध्ये आम्हाला दोन परभव पत्करावे लागले. भारताने दोन्ही वेळेस आम्हाला पराभूत केले,''असे विंडीजचे महान खेळाडू अँडी रॉबर्ट म्हणाले.
रॉबर्ट यांनी ४७ कसोटी व ५६ वन डे सामन्यांत अनुक्रमे २०२ व ८७ विकेट्स घेतल्या.''आम्ही चांगल्या फॉर्मात होतो, परंतु १९८३ मध्ये भारताला नशिबाने साथ दिली. पण, वर्ल्ड कप स्पर्धेनंतर ६ महिन्यांतच आम्ही भारतावर ६-० असा दणदणीत विजय मिळवला. १८३ धावा करणाऱ्या भारताला तेव्हा नशिबाची साथ मिळाली. व्हीव्ह रिचर्डसची विकेट कलाटणी देणारी ठरली,''असेही ते म्हणाले.