कोलकाता : युवा प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असलेला भारतीय संघ आठ महिन्यांनंतर होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर डोळा ठेवून संघ बांधणीच्या तयारीत आहे. त्यादृष्टीने बुधवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यष्टीरक्षक- सलामीवीर ईशान किशन आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर यांच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
मागच्या वर्षी यूएईत झालेल्या टी-२० विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात असलेला भारतीय संघ साखळीतच गारद झाला होता. संघ संयोजनातील उणिवा चव्हाट्यावर येताच कर्णधार या नात्याने विश्वविजेते होण्याचे विराट कोहलीचे स्वप्न भंगले होते. ऑस्ट्रेलियात आगामी १६ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या टी-२० विश्वचषकाआधी भारताचे वेळापत्रक व्यस्त आहे.संघ बांधणीचा भाग म्हणून रोहितच्या नेतृत्वात सलामीची जोडी, मधली फळी आणि गोलंदाजी यात संयोजन तयार करावे लागेल. भारतीय संघात ईशान, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर असे प्रतिभावान खेळाडू आहेत. मांसपेशीच्या दुखण्यामुळे राहुल बाहेर असल्याने रोहितचा सलामीचा जोडीदार कोण, हा प्रश्न कायम आहे.
अहमदाबादमध्ये झालेल्या वन डे मालिकेतील तीनही सामन्यांत रोहितसोबत अनुक्रमे ईशान, ऋषभ आणि शिखर धवन सलामीला खेळले होते. ईडनवर ईशानला सलामीची संधी मिळू शकते. दुसरीकडे ऋतुराज गायकवाड हादेखील दावेदार मानला जातो. व्यंकटेशदेखील कर्णधारासोबत सलाला येऊ शकेल. वन डे मालिकेत फ्लॉप झालेला किरोन पोलार्डच्या नेतृत्वाखालील विंडीज संघ आवडीच्या टी-२० प्रकारात कशी मुसंडी मारेल, याची उत्सुकता आहे. मायदेशात त्यांनी या प्रकारात इंग्लंडला ३-२ ने धूळ चारली होती. जेसन होल्डरसह अनेक आक्रमक फलंदाज आणि चांगले गोलंदाज या संघात आहेत. ओडियन स्मिथ, अकील हुसेन आणि पोलार्ड यांच्याकडून ईडनवर अष्टपैलू कामगिरी अपेक्षित आहे.
कोहली सलामीला खेळणार?
माजी कर्णधार विराट कोहली हा रोहितसोबत सलामीला आल्यास दोघांना खेळताना पाहणे रोमहर्षक ठरेल.
कोहलीने याच मैदानावर नोव्हेंबर २०१९ ला अखेरचे कसोटी शतक दिवस-रात्र सामन्यात बांगलादेशविरुद्ध ठोकले होते.
याशिवाय पंतला विश्रांती देत ईशानला यष्टीरक्षणासाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.
यामुळे श्रेयस आणि सूर्यकुमार या दोघांना संधी मिळेल. तळाच्या स्थानासाठी शार्दूल ठाकूर, दीपक चाहर आणि हर्षल पटेल असतील. फिरकीची बाजू युजवेंद्र चहलकडे असेल.
उभय संघ यातून निवडणार
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, ऋतुराज गायकवाड़, दीपक हुड्डा, कुलदीप यादव आणि हरप्रीत बरार
वेस्ट इंडिज : किरोन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन, फॅबियन ॲलेन, डेरेन ब्रावो, रोस्टन चेज, शेल्डन कॉटरेल, डोमीनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसेन, ब्रेंडन किंग, रोवमॅन पॉवेल, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, काइल मेयर्स, हेडन वॉल्श ज्युनियर.
रवी बिश्नोईला संधी...
वॉशिंग्टन सुंदरच्या पायाचे स्नायू ताणले गेल्यामुळे तो टी-२० मालिकेबाहेर पडला. यामुळे लेग स्पिनर रवी बिश्नोई पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे. आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्ये शानदार कामगिरीच्या बळावर बिश्नोईला भारतीय संघात स्थान देण्यात आले.
Web Title: India-West Indies T20 series from today; Emphasis on team building for the World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.