नवी दिल्ली : बीसीसीआयच्या फिजिओमुळे भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा फक्त भारताच्या संघाच्या बाहेर गेला नाही, तर त्याची सध्याची अवस्था फारच गंभीर झाली आहे. कारण सध्याच्या घडीला त्याला बॅटही उचलता येत नाही.
साहाच्या खांद्याला जी दुखापत झाली आहे त्यासाठी बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील फिजिओ जबाबदार आहे. खेळाडूंच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या या फिजिओवर बीसीसीआयने अद्याप कोणताही कारवाई केलेली नाही. त्याचबरोबर या प्रकरणात आपली भूमिकाही स्पष्ट केलेली नाही. साहाच्या उपचाराचा खर्च बीसीसीआय उचलणार असेलही, पण खेळाडूंच्या करिअरशी खेळणाऱ्या फिजिओला नेमकी काय शिक्षा करणार, याची वाट चाहते पाहत आहेत.
नेमकं काय आहे प्रकरणसाहाला आयपीएलदरम्यान अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे काही सामन्यांमध्ये त्याला खेळताही आले नव्हते. दुखापतीवर उपचार घेतल्यावर साहा बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झाला. या अकादमीतील एका फिजिओने त्याला काही व्यायामप्रकार सांगितले. या व्यायामप्रकारामुळे आता साहाला खांद्याची दुखापत झाली आहे. आता जर साहाला खेळायचे असेल तर त्याच्यासाठी खांद्यावर शस्त्रक्रीया करावी लागेल.