दुबई : यंदा ३ ते २० ऑक्टोबरदरम्यान बांगलादेशमध्ये रंगणाऱ्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने रविवारी जाहीर केले. या वेळापत्रकानुसार ६ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान सामना रंगेल. स्पर्धेत अ गटात भारत पाकिस्तानसह न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि पात्रता स्पर्धेतील विजेता संघ यांचा समावेश आहे. ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि पात्रता स्पर्धेतील उपविजेता या संघांचा समावेश आहे.
सलामी लढत ३ ऑक्टोबरला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ढाका येथे रंगणार असून अंतिम सामना २० ऑक्टोबरला ढाका येथेच खेळविण्यात येईल. भारताचे साखळी फेरीतील सर्व सामने सिलहट येथे खेळविण्यात येणार आहे. ४ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याने भारतीय संघ मोहिमेला सुरुवात करणार असून ६ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध हात करेल. ९ ऑक्टोबरला पात्रता फेरी विजेत्या संघाविरुद्ध खेळल्यानंतर भारतीय संघ १३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाच्या तगड्या आव्हानाचा सामना करेल.
आयसीसीने माहिती दिली की, ‘प्रत्येक संघ चार साखळी सामने खेळणार असून दोन्ही गटातील अव्वल दोन संघ १७ ऑक्टोबरला सिलहट येथे आणि १८ ऑक्टोबरला ढाका येथे उपांत्य सामन्यांत खेळतील.’
भारतीय संघाचे साखळी सामने ४ ऑक्टोबर २०२४ : न्यूझीलंडविरुद्ध, सिलहट ६ ऑक्टोबर २०२४ : पाकिस्तानविरुद्ध, सिलहट ९ ऑक्टोबर २०२४ : पात्रता फेरीतील अव्वल संघ, सिलहट १३ ऑक्टोबर २०२४ : ऑस्ट्रेलियाविरुद्ध, सिलहट