Join us  

झकास स्टार्टनंतर भारताचा डाव गडगडला

पहिल्या दोन कसोटी सामन्यांप्रमाणे तिस-या कसोटीतही भारताने दमदार सुरुवात केली होती. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी केली. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 10:21 AM

Open in App
ठळक मुद्देविराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले २ सामने सहज जिंकले आहेतविदेशात ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप देणारा पहिला भारतीय संघ होण्याची संधीभारताने आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे

कॅन्डी, दि. 12 - पहिल्या दोन कसोटी सामन्यांप्रमाणे तिस-या कसोटीतही भारताने दमदार सुरुवात केली होती. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी केली. पण हे दोघे बाद झाल्यानंतर कर्णधार कोहली (42), चेतेश्वर पूजारा (8) आणि अजिंक्य रहाणेला (17) खेळपट्टीवर पाय रोवणे न जमल्याने श्रीलंकेला वरचढ होण्याची संधी मिळाली. भारताच्या पहिल्या दिवसअखेर 6 बाद 329 धावा झाल्या आहेत. अश्विन बाद होणारा शेवटचा गडी ठरला. त्याला (31) धावांवर फर्नाडोने डिकवेलाकरवी झेलबाद केले. वृद्धीमान सहा नाबाद (13) आणि हार्दिक पांडयाची नाबाद (1) जोडी मैदानावर आहे. 

शिखर धवनने आक्रमक फलंदाजी करत कसोटी करिअरमधील सहावं शतक ठोकलं. के एल राहुलने सलग सातवं अर्धशतक करत नवा विक्रम आपल्या नावे केला. मात्र तो शतक पुर्ण करु शकला नाही. के एल राहुल 85 धावांवर बाद झाला. धवनने (119) आणि राहुलने (85) धावा केल्या.  पुष्पकुमाराने तीन तर, संदाकाने दोन विकेट घेतल्या. 

पहिल्या दोन्ही कसोटीत भारताने पहिल्या डावात 600 धावांचा डोंगर उभारल्याने श्रीलंकेला कसोटीत पुनरागमनाची संधीच मिळाली नाही. आता पाच विकेट गेल्यामुळे भारत धावांचा डोंगर उभा करेल का ? याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. 

सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये श्रीलंकेचा दारुण पराभव करणा-या भारतीय क्रिकेट संघाकडे तिसरा सामना जिंकत इतिहास घडवण्याची नामी संधी आहे. ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर असलेल्या विराट अ‍ॅन्ड कंपनीला श्रीलंकेविरुद्ध तिस-या आणि अखेरच्या कसोटीत विजय नोंदवून परदेशात तीन सामन्यांच्या मालिकेत ‘व्हाईट वॉश’ करण्याची नामी संधी असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले २ सामने सहज जिंकले आहेत. जर तिसऱ्या व अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयी मोहीम कायम राखण्यात यशस्वी ठरला, तर विदेशात ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप देणारा हा पहिला भारतीय संघ ठरेल.

तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. आपल्या ८५ वर्षांच्या कसोटी इतिहासात आतापर्यंत विदेशात केवळ एकदा कसोटी मालिकेत ३ सामने जिंकण्याची कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाकडे आता श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत इतिहास रचण्याची संधी आहे. विदेशात प्रथमच सलग ३ कसोटी सामने जिंकण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.

विदेशात क्लीन स्वीपचा विचार केला, तर भारताने आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. पण, या मालिकांत केवळ एक किंवा दोन सामने मर्यादित होते. भारताने २०००मध्ये बांगलादेशाचा एका कसोटी सामन्याच्या मालिकेत १-० ने, तर २००४ व २०१०मध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने पराभव केला होता.

भारताने मायदेशात खेळताना यापूर्वी ३ किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केलेले आहे. भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पराभव केला. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील संघाने १९९३-९४ मध्ये इंग्लंड व श्रीलंका या संघांविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीपची नोंद केली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध या पराक्रमाची पुनरावृत्ती केली.

सध्या सुरू असलेल्या मालिकेत भारताने गालेमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा ३०४ धावांनी, तर कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव ५३ धावांनी पराभव केला. फॉर्मचा विचार करता, भारतीय संघ पल्लेकलमध्ये विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून सहभागी होणार आहे.

यजमान संघात दोन नवे चेहरे...लंकेने जखमी नुवान प्रदीप आणि रंगना हेरथ यांच्या जागी संघात वेगवान गोलंदाज दुष्यंता चामिरा आणि लाहिरू गामेगे यांना स्थान दिले.

आकडे काय सांगतात...कोहलीच्या नेतृत्वात भारत आतापर्यंत २८ कसोटी सामने खेळला. त्यात त्याने एकदाही सारखा संघ खेळविला नाही. हाच ‘ट्रेंड’ या कसोटीतही पाहायला मिळू शकतो.भारताने १९३२ ला कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून ८५ वर्षांत विदेशात कधीही ‘व्हाईट वॉश’ केलेले नाही. आपल्याच देशातही भारताला अधिक ‘व्हाईट वॉश’ करण्यात अपयश आले. केवळ चारच कसोटी मालिकेत सर्वच्या सर्व सामने जिंकले होते.मोहम्मद अझहरुद्दीनच्या नेतृत्वात भारताने १९९३ मध्ये इंग्लंडला ३-० ने आणि १९४३ साली श्रीलंकेला ३-० ने , महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाला ४-० ने आणि मागच्या वर्षी कोहलीच्या नेतृत्वात न्यूझीलंडला ३-० ने पराभूत केले.विदेशात भारताने जे अविस्मरणीय विजय नोंदविले त्यात कपिल देवच्या नेतृत्वाखाली १९८६ साली इंग्लंडमध्ये २-० ने मिळालेला विजय, पाकमध्ये २००४ मध्ये २-१ ने आणि २०१५ मध्ये श्रीलंकेवर २-१ ने मिळालेल्या विजयाचा समावेश आहे.भारताने पतोडी यांच्या नेतृत्वात १९६७-६८ साली न्यूझीलंडमध्ये ३-१ ने मालिका विजय नोंदविला होता. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २००४-०५ मध्ये बांगलादेशला, २००५ मध्ये झिम्बाब्वेला आणि २००९ मध्ये पुन्हा बांगलाचा सफाया केला.