नवी मुंबई : यष्टिरक्षक फलंदाज ऋचा घोष हिने टी-२० मालिकेतील विजयानंतर भारतीय महिला संघाला आत्मसंतुष्टता टाळण्याचा आग्रह करताना तीन सामन्यांच्या आगामी एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध आक्रमक राहण्याचा सल्ला दिला.
घोषने विश्वविक्रमाची बरोबरी करताना केवळ १८ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्यामुळे भारताने गुरुवारी तिसऱ्या टी-२० सामन्यात २१७ धावा केल्या. तिने सर्वांत वेगवान अर्धशतकाच्या विक्रमात न्यूझीलंडची सोफी डिव्हाइन आणि ऑस्ट्रेलियाची फोबी लिचफिल्ड यांची बरोबरी केली. मालिका २-१ अशी जिंकल्यानंतर ती म्हणाली की, आम्ही ही लय वनडेमध्ये कायम राखू इच्छितो. आम्हाला आक्रमक राहावे लागणार आहे. हे नवे मैदान आहे आणि आम्हाला परिस्थितीचे आकलन करून रणनीती तयार करावी लागेल.
ऋचा घोष म्हणाली की, प्रत्येक सामन्यात आक्रमक फलंदाजी करण्याची माझी इच्छा असते. सराव शिबिरातून हे येते. सराव सत्रात सराव केल्यानंतर सामन्यात ते उतरविणे सोपे होते. मी अशीच तयारी केली आणि त्याचा मला फायदा झाला.
ऋचा म्हणाली की, 'मी सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाज आहे. मी माझ्या वडिलांनाही असेच खेळताना पाहिले आहे. मी तंदुरुस्तीवर खूप मेहनत घेतली आहे. याशिवाय महिला प्रीमियर लीग आणि महिला बिग बॅश लीगमध्ये खेळण्याचाही खूप फायदा झाला.