विशाखापट्टणम : वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवत मालिकेत पुनरागमन करण्यासह आव्हान कायम राखण्यास प्रयत्नशील असलेल्या भारतीय संघाला बुधवारी दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आपल्या गोलंदाजी संयोजनात सुधारणा करावी लागणार आहे. ही मालिका जिंकली, तर कर्णधार म्हणून किरोन पोलार्डचा स्तर आणखी उंचावेल, पण विंडीजसाठी फलंदाजांसाठी अनुकूल या खेळपट्टीवर विराट कोहली व रोहित शर्मा यांना रोखणे सोपे नाही.
चेन्नईमध्ये पहिल्या लढतीत भारताची गोलंदाजी खराब नव्हती, पण संथ खेळपट्टी २८७ धावा फटकावल्यानंतरही विजय मिळवण्यात अपयशी ठरल्यामुळे संघ व्यवस्थापनापुढे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. येथील एमसीए व्हीडीसीए स्टेडियममध्ये ३२० धावांचे लक्ष्य चांगले मानले जात आहे. त्यामुळे पाचव्या गोलंदाजाच्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो. गेल्या लढतीत शिमरोन हेटमायेर आणि शाई होप यांच्या वैयक्तिक शतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने लक्ष्याचा सहज पाठलाग केला.
फिरकीपटू रवींद्र जडेजा व कुलदीप यादव या लढतीत सपशेल अपयशी ठरले. त्यांनी १० षटकांत अनुक्रमे ५८ व ४५ धावा दिल्या, पण बळींचा विचार करता त्यांची पाटी कोरीच राहिली. होप व हेटमायेर यांनी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला नसला तरी मधल्या षटकांमध्ये जोखिम न पत्करता १०३ धावा फटकावल्या. शिवम दुबेने ७.५ षटकांत ६८ धावा बहाल केल्या. त्यावरून त्याला गोलंदाजीमध्ये अधिक मेहनत घेण्याची गरज असल्याचे स्पष्ट होते.
भारताच्या राखीव खेळाडूंमध्ये सलामीवीर फलंदाज मयांक अग्रवाल आहे, पण रोहित व लोकेश राहुलचा शानदार फॉर्म लक्षात घेता त्याच्या खेळण्याची शक्यता धुसर आहे. मनीष पांडे मधल्या फळीचा फलंदाज असून तो सहाव्या क्रमांकावर केदार जाधवचे स्थान घेऊ शकतो. मात्र जाधवने चेन्नईमध्ये ३३ चेंडूंत ४० धावा केल्या.पाचव्या गोलंदाजाचा पर्याय म्हणून वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर व लेग स्पिनर यजुवेंद्र चहल आहे. यापैकी एकाची निवड केलीतर अष्टपैलू दुबे किंवा रवींद्रजडेजा यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागेल. दुबे गेल्या लढतीत आठव्या क्रमांकावर खेळला होता. त्याच्या स्थानी शार्दुलला संधी मिळू शकते.विंडीजची आशा हेटमायेरवर केंद्रित झालेली असेल. तसेच शाय होप, ब्रँडन किंग व निकोलस पूरन यांच्याकडूनही विंडीजला आशा आहेत. कर्णधार पोलार्डच्या चतुराईचाई भारतीयांना सामना करावा लागेल. कॅरेबियन वेगवान गोलंदाज शेल्डॉन कॉटेÑल व अलझारी जोसेफ यांनी चांगली कामगिरी केली. किमो पॉलसह वेगवान गोलंदाजांनी विविधता दाखविली.
प्रतिस्पर्धी संघभारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर.वेस्ट इंडिज : किएरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनील अंबरीश, शाई होप, खैरी पियरे, रोस्टन चेस, अलझारी जोसेफ, शेल्डॉन कॉटेÑल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमरान हेटमायेर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल आणि हेडन वॉल्श ज्युनिअर.