भारतीय खेळाडू इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये व्यग्र आहेत आणि त्यांना लगेचच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा खेळायची आहे. २ जूनपासून अमेरिका व वेस्ट इंडिज येथे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे आणि भारताचा पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. या रणसंग्रामासाठी भारतीय संघ दोन बॅचमध्ये अमेरिकेला रवाना होणार आहेत. २५ व २६ मे रोजी अशा दोन बॅचमध्ये भारतीय खेळाडू अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत आणि आयपीएल २०२४ च्या प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणाऱ्या संघातील खेळाडू ज्यांचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड झाली आहे, ते पहिल्या बॅचमधून निघणार आहे.
आयपीएल २०२४ मुळे भारतीय खेळाडू थोडे उशीराच अमेरिकेत दाखल होणार आहेत. त्यामुळे यूएस आणि वेस्ट इंडिजमध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारत फक्त एकच सराव सामना खेळता येणार आहे. यामागचं कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु बीसीसीआयने हा सराव सामना न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्याचा आग्रह धरला आहे, जिथे संघाच कॅम्प लागणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणि क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI), यांनी फ्लोरिडामध्ये सराव सामन्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचे समजतेय. पण, भारतीय खेळाडू प्रवासामुळे आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मुळे थकलेले असतील आणि त्यांना न्यूयॉर्क ते फ्लोरिडा असा एका सामन्यासाठी प्रवास करणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे
भारताच्या सराव सामन्यांचे व्यावसायिक मूल्य जास्त असते आणि भरपूर कमाईच्या संधींमुळे त्याचे थेट प्रक्षेपण केले जात. २०१५ मध्ये ॲडलेडमधील भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला सराव सामना भारतात प्रसारित झाला होता. सराव सामन्यांचे वेळापत्रक काही दिवसांत जाहीर होणार असल्याचे संकेत आयसीसीने दिले आहेत. पाकिस्तान आणि इंग्लंड वगळता इतर बहुतेक संघ प्रत्येकी दोन सराव सामने खेळणार आहेत.
इंग्लंड आणि पाकिस्तान सध्या द्विपक्षीय मालिका खेळत, जी ३० मे रोजी संपेल, ज्यामुळे त्यांना सराव सामन्यांसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. भारतीय संघ सुरुवातीला आयपीएल लीग स्टेजच्या समाप्तीनंतर लगेचच २१ मे रोजी न्यूयॉर्कला रवाना होणार होता. पण, आता संघ २५ व २६ मे रोजी दोन बॅचमध्ये रवाना होणार आहे. न्यू यॉर्कमध्ये भारताचे लीग सामने ५ जून (वि. आयर्लंड), ९ जून ( वि. पाकिस्तान ) आणि १२ जून ( वि. अमेरिका ) रोजी होणार आहेत. कॅनडाविरुद्धचा अंतिम लीग सामना १५ जून रोजी फ्लोरिडामध्ये होणार आहे.