नवी दिल्ली - भारताच्या शेजारी असलेल्या नेपाळला काल गुरुवारी आयसीसीने एकदिवसीय क्रिकेट सामने खेळण्याचा दर्जा दिला आहे. विश्वचषक पात्रता फेरीमध्ये काल झालेल्या सामन्यात नेपाळने पपुआ न्यू गिनीसंघावर सहा विकेट राखून शानदार विजय मिळवला. या पराभवामुळे मात्र पपुओ न्यू गिनी संघाने आपला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा गमावला आहे.
काल झालेल्या सामन्यात अष्टपैलू दीपेंद्र सिंग ऐरीने विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने पापुओ गिनी संघाच्या चार फलंदाजाला बाद केले. तर फलंदाजी करताना त्याने 58 चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारासह नाबाद 50 धावा काढल्या. दीपेंद्र सिंगशिवाय संदीप लॅमिचानेही पापुआ संघाला चार धक्के दिले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पपुआ न्यू गिनी संघाचा डाव 24.2 षटकांत 114 धावांत संपुष्टात आला. आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या नेपाळने चार फलंदाजांच्या मोबदल्यात 23 षटकांत विजयी लक्ष्य पार केले.
पात्रता फेरीतील काल झालेल्या अन्य एका सामन्यातही मोठा उलटफेर पहायला मिळाला. बलाढ्या वेस्ट इंडिजचा आफगाणिस्तानने पराभव केला. दिवसेंदिवस क्रिकेटमध्ये आपलं नाव प्रस्थापित करु पाहणाऱ्या आफगाणिस्तानने वेस्ट इंडिजला पराभवचा धक्का दिला आहे. मुजिबूर रेहमानचा फिरकी मारा आणि रेहमत शाहच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर अफगाणिस्ताने बलाढय़ वेस्ट इंडिजवर तीन विकेट राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 197 धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तानने 47.3 षटकांत सात फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पेलले. शाहने 109 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह 68 धावा करत विजयात सिंहाचा वाटा उचलला.