नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ १८ जूनला न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी उतरेल. इंग्लंडच्या साऊथॅम्पटनमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. भारत पहिल्यांदाच तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) टेस्टचा दर्जा प्राप्त असलेले १२ पैकी १० देश तटस्थ ठिकाणी कसोटी सामने खेळले आहेत. आता या यादीत भारताचा समावेश होईल.
भारतीय क्रिकेटच्या ८९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच संघ तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळेल. कसोटी दर्जा प्राप्त असलेले भारत आणि बांगलादेश हे दोनच संघ आतापर्यंत तटस्थ ठिकाणी सामना खेळलेले नाहीत. उर्वरित १० संघ तटस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळलेले आहेत. भारत पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यास उतरेल. भारतीय संघ साऊथॅम्पटनच्या मैदानावर उतरताच इतिहास रचला जाईल.
पाकिस्तानात काही वर्षांपूर्वी श्रीलंकेच्या संघाच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. त्यामुळे एक दशकांपासून अधिक काळापासून कोणताही संघ पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यास गेलेला नाही. या कालावधीत पाकिस्तान यूएई आणि श्रीलंकेत क्रिकेट मालिकांचं आयोजन करत आहे. बाकीचे देश पाकिस्तानविरुद्ध खेळत असल्यानं त्यांना तटस्थ ठिकाणी खेळण्याची संधी मिळाली आहे.
२२ वर्षांपूर्वी मिळाली होती संधी
तटस्थ ठिकाणी खेळण्याची संधी भारताला १९९९ मध्ये मिळाली असती. त्यावेळी भारतीय संघ आशियाई टेस्ट चॅम्पिनयशिप खेळत होता. या स्पर्धेचा अंतिम सामना ढाक्यात खेळला गेला. पाकिस्तान आणि श्रीलंकेत अंतिम सामना रंगला. त्यावेळी भारतीय संघ अंतिम फेरीत गेला असता, तर तटस्थ ठिकाणी खेळण्याची संधी भारताला मिळाली असती.
Web Title: India Will Play Test Matches At Neutral Venue For The First Time
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.