भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खेळतोय आणि या मालिकेनंतर भारतीय खेळाडू इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आपापल्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसतील. इंग्लंड मालिकेनंतर भारतीय संघ एकत्रित येईल तो थेट जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी... त्यानंतर भारतीय संघाचे दौरे सुरू होतील... अमेरिका व कॅरेबियन बेटावर होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारतीय संघ लगेचच पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तानचा संघ सारखा झिम्बाब्वे दौऱ्यावर जाऊन विक्रम रचत असतो आता भारतीय खेळाडू तिथे जाऊन मोठे पराक्रम करताना दिसतील.
झिम्बाब्वे क्रिकेट आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांनी मंगळवारी भारत-झिम्बाब्वे ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. ६ ते १४ जुलै या कालावधीत हरारे येथे ही मालिका खेळवण्यात येणार आहे. हे सामने भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४.३० वाजल्यापासून सुरू होणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, जागतिक क्रिकेटच्या विकासासाठी बीसीसीआय नेहमी पुढाकार घेत आले आहेत. झिम्बाब्वे आणि झिम्बाब्वे क्रिकेटच्या पुनर्विकासाची गरज आहे आणि ही मालिका त्यासाठी हातभार लावेल.
या मालिकेसाठी जुलै महिन्यात संघ जाहीर केला जाईल. भारतीय संघाने २०१० ते २०१६ या कालावधीत झिम्बाब्वे दौऱ्यावर ७ ट्वेंटी-२० सामने खेळले आणि त्यापैकी ५ जिंकले, दोन सामन्यांत भारताला पराभव पत्करावा लागला होता.