अँटिग्वा : अजिंक्य रहाणेने झळकावलेले दहावे शतक व हनुमा विहारीच्या ९३ धावांनंतर जसप्रीत बुमराहने अवघ्या ७ धावांत घेतलेल्या ५ बळींमुळे पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा ३१८ धावांनी धुव्वा उडविला. रविवारी, चौथ्या दिवशी विजयासाठी ४१९ धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान दुसऱ्या डावात १०० धावांवर गारद झाला. यासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने१-०ने आघाडी घेतानाच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजयी सलामी देताना गुणांचे खातेही उघडले.
विशेष म्हणजे, विंडीजच्या सर्व फलंदाजांना भारताच्या तिन्ही वेगवान गोलंदाजांनी बाद केले. इशांतने ३१ धावांत ३ तर, शमीने १३ धावांत २ बळी घेत बुमराहला चांगली साथ दिली. एकवेळ विंडीजच्या ९ बाद ५० धावा झाल्या होत्या. त्यानंतर केमार रोच (३६) आणि कमिन्स (नाबाद १९) या जोडीने दहाव्या गड्यासाठी ५० धावा जोडत पराभव लांबविला. अखेर इशांतने रोचला बाद करीत भारताच्या विजयावर शिक्का मारला.
भारताने उपाहारानंतर एका तासाने दुसरा डाव ७ बाद ३४३ धावांवर घोषित केला. रहाणेने १०२ धावा केल्या, तर विहारी ९३ धावांवर बाद झाला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी १३५ धावांची भागीदारी केली. विहारी बाद होताच कोहलीने भारताचा दुसरा डाव घोषित केला. त्यानंतर विंडीजने ७.३ षटकांत अवघ्या १५ धावांत अर्धा संघ गमावला होता. केमार रोचने विंडीजकडून दुसºया डावात सर्वाधिक ३८ धावांची खेळी करत एक चौकार व ५ षटकार ठोकले. एम. कमिन्स याने २२ चेंडूत २ चौकार व एका षटकारासह नाबाद १९ धावा केल्या.बुम बुम.. बुमराह!कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कमी धावा देऊन ५ बळी घेणारा बुमराह यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी हा विक्रम व्यंकटपती राजू (६/१२ वि. श्रीलंका, १९९०) याच्या नावावर होता. पण, याहीपेक्षा या पाच बळी बुमराहसाठी विश्वविक्रमी ठरल्या. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया व वेस्ट इंडिज अशाचारही देशांत एकाच कसोटी डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम करणारा बुमराह हा पहिला आशियाईगोलंदाज ठरला.कर्णधार विराट कोहलीचे दमदार विजयी शतक!कर्णधार म्हणून कोहलीचा हा शंभरावा विजय ठरला. त्याने २७ कसोटी, ५८ एकदिवसीय व १५ टी२० सामन्यांत कर्णधार म्हणून विजय मिळवले. कोहलीने १५२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत हा पल्ला गाठला. विजयाचे शतक साजरे करणारा कोहली तिसरा भारतीय, तर १२वा आंतरराष्ट्रीय कर्णधार आहे.भारतीय कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनी १७८ विजयासह आघाडीवर असून मोहम्मद अझरुद्दीनच्या नावावर १०४ विजय आहेत. या विक्रमात आॅस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (२२०) अव्वल आहे. जलद १०० विजय मिळवणाºया कर्णधारांमध्ये कोहली चौथ्या स्थानी असून पाँटिंग (१३४ सामने), स्टीव्ह वॉ (१५०) व हॅन्सी क्रोनिए (१५१) अव्वल तीन स्थानावर आहेत.भारताने परदेशात सर्वात मोठा कसोटी विजय मिळवला. २०१७मध्ये गॅले येथे भारताने श्रीलंकेला ३०४ धावांनी नमवले होते. भारताने कसोटीत सर्वात मोठ्या (धावांच्या फरकाने) अव्वल पाचपैकी चार विजय कोहलीच्या नेतृत्वात मिळवले आहेत.संक्षिप्त धावफलकपहिला डाव : भारत : सर्वबाद २९७., वेस्टइंडिज : सर्वबाद २२२.दुसरा डाव : भारत : १०१ षटकांत ४ बाद २८७. (रहाणे १०२, विहारी ९३, कोहली ५१; चेज ४/१३२). विंडिज : २६.५ षटकांत सर्व बाद १०० (रोच ३६, कमिन्स नाबाद १९, बुमराह ५/७, इशांत ३/३१, शमी २/१३).टीम इंडिया अव्वल स्थानीजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील प्रत्येक मालिकेसाठी आयसीसीने केलेल्या गुणांच्या विभागणीनुसार भारताने वेस्ट इंडिजला नमवून ६० गुणांची कमाई केली. या विजयामुळे भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. टीम इंडिया व श्रीलंका यांच्या खात्यातील गुणांची संख्या समान आहे. पण, भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवून अव्वल स्थान पटकावले. या क्रमवारीत आॅस्ट्रेलिया व इंग्लंड प्रत्येकी ३२ गुणांसह अनुक्रमे तिसºया व चौथ्या स्थानी आहेत.