Join us

U19 Women's T20 Asia Cup Final : पहिल्या वहिल्या हंगामात भारतीय संघ चॅम्पियन; बांगलादेशला शह देत उंचावली ट्रॉफी

आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला संघाचा बोलबाला, पहिल्या वहिल्या हंगामात बांगलादेश संघाला शह देत जिंकली ट्रॉफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 10:48 IST

Open in App

India Women vs Bangladesh Under 19 Women's T20 Asia Cup Final : मलेशियाची राजधानी क्वालालंपूरच्या मैदानात  १९ वर्षांखालील महिला आशिया कप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात १९ वर्षांखालील भारतीय संघानं बांगलादेशच्या संघाला ४१ धावांनी पराभूत करत फायनल बाजी मारली. याआधी पुरुष गटातही भारत-बांगलादेश असा फायनल सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. त्यावेळी भारतीय संघाच्या पदरी अपयश आले होते. पण १९ वर्षांखालील भारतीय महिला संघानं या पराभवाचा वचपा काढत महिला गटातील पहिल्या वहिल्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरले आहे.

भारताकडून गोंगाडी त्रिशाचं दमदार अन् उपयुक्त अर्धशतक

फायनल लढतीत बांगलादेशच्या संघानं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघानं निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात ११७ धावा केल्या होत्या. भारताकडून सलामीची बॅटर गोंगाडी त्रिशा (Gongadi Trisha) हिने ४७ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावांची दमदार खेळी केली. तिच्याशिवाय भारतीय संघाची कर्णधार  निकी प्रसाद २१ (१२) मिथिला विनोद १७ (१२) आणि आयुषी शुक्ला १० (१३) या तिघींनी दुहेरी आकडा गाठला. दुसरीकडे बांगलादेश संघाकडून फरजाना हिने सर्वाधइक ४ विकेट्स घेतल्या.  निशिता अख्तरच्या खात्यात २ विकेट्स तर हबिबा इस्लाम हिला एक विकेट मिळाली.

गोलंदाजीत आयुषी शुक्लाचाही दिसला जलवा

भारतीय महिला संघानं दिलेल्या ११८ धावांटा पाठलाग करताना बांगलादेश संघातील एकाही बॅटरचा निभाव लागला नाही. सलामीवीर फहोमिदा १८ (२४) आणि जैरिया २२(३०) या दोघींशिवाय एकीलाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. परिणामी बांगलादेशचा संघ १९ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरच ७६ धावांत ऑलआउट झाला. भारताकडून आय़ुषी शुक्ला हिने ३. ३ षटकात १७ धावा खर्च करून ३ विकेट्स मिळवल्या. सोनम यादव आणि परुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. व्ही जे जोशिथा हिला एक यश मिळाले.

टॅग्स :एशिया कप 2023भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबांगलादेश