Join us  

भारताची नजर चौथ्या विजयावर; लंकेविरुद्ध भारताला एकतर्फी विजयाची संधी

खेळाडूंच्या दुखापती आणि आजाराने ग्रासलेल्या श्रीलंका संघाला सलग चौथ्या वन-डेत एकतर्फी धूळ चारण्याची भारताला आज गुरुवारी संधी असेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 1:51 AM

Open in App

कोलंबो : खेळाडूंच्या दुखापती आणि आजाराने ग्रासलेल्या श्रीलंका संघाला सलग चौथ्या वन-डेत एकतर्फी धूळ चारण्याची भारताला आज गुरुवारी संधी असेल. महेंद्रसिंह धोनीचा हा ३०० वा सामना असल्याने अविस्मरणीय खेळीसह त्याने सामना जिंकून द्यावा, अशीच चाहत्यांची अपेक्षा आहे. याआधीचे तिन्ही सामने एकतर्फी झाले, हे विशेष.लंकेकडून अकिला धनंजया याचा अपवाद वगळता लंकेचा एकही गोलंदाज भारतीय फलंदाजांवर दडपण आणू शकला नाही. त्यामुळेच विराट कोहलीचे लक्ष्य ‘बेंच स्ट्रेंग्थ’ला संधी देणे, हे असेल. यात कुलदीप यादव, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर यांची वर्णी लागेल.कोहली स्वत: कामगिरीकरण्यात अपयशी ठरला. चौथ्या स्थानावर लोकेश राहुललादेखील मोठी खेळी करायची आहे. सलग दोन सामन्यांत खाते उघडण्यात अपयशी केदार जाधव अकिलाच्या गुगलीचा बळी ठरला होता. जाधवच्या जागी मनीष पांडे खेळतो काय, हे पाहावे लागेल.वेगवान शार्दुलने सरावादरम्यान अप्रतिम मारा केला, पण भुवनेश्वर आणि बुमराह यांना विश्रांती देण्याची जोखीम कोहली पत्करणार नाही. खेळाडूंना संधी देण्याचे धोरण कोहलीने स्वीकारले असल्याने, कुलदीपला संधी मिळाल्यास अक्षर पटेल किंवा यजुवेंद्र चहल यापैकी एकाला बाहेर बसावे लागेल.दुसरीकडे लंकेला सर्वोत्कृष्ट ११ खेळाडू निवडणे कठीण झाले आहे. सनथ जयसूर्याच्या नेतृत्वाखालील निवड समितीने राजीनामा दिला असून, तो स्वीकारण्यात आला आहे. दिनेश चंडीमलच्या अंगठ्याला मागच्या सामन्यात दुखापत झाली. काळजीवाहू कर्णधार चमारा कापुगेदरा हा पाठदुखीमुळे त्रस्त असल्याने, उर्वरित दोन सामन्यांसाठी लसिथ मलिंगा कर्णधारपद सांभाळेल. (वृत्तसंस्था)धोनी@ ३००! पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका काबीज करीत भारतीय संघाने श्रीलंका दौºयाची मोहीम फत्ते केली. आता चौथ्या सामन्यात सर्वांच्या नजरा असतील त्या माहीवर. हा सामना केवळ औपचारिक असला तरी तो महेंद्रसिंह धोनीसाठी खास असेल; कारण धोनीच्या एकदिवसीय कारकिर्दीतील तो ३०० वा वनडे आहे. तो गेल्या १३ वर्षांपासून खेळत आहे. भारताकडून ३०० वनडे खेळणारा माही हा देशाचा सहावा खेळाडू आहे. या यादीत सचिन तेंडुलकर आघाडीवर आहे. सचिनने सर्वाधिक ४६३ सामने खेळले आहेत.सध्या आम्ही काही सामने गमावले असले, तरी मला वाटते की आमच्याकडे चांगले युवा खेळाडू असून काही अनुभवी खेळाडूही आहेत. आम्हाला पुढाकार घेऊन जबाबदारी घेण्याची आवश्यकता असून युवा खेळाडूंना आत्मविश्वास द्यावा लागेल की, सद्यपरिस्थितीमध्येही आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले क्रिकेट खेळू शकतो. अनेकांना वाटते की, आम्ही क्रमवारीत आघाडीवर नाही. परंतु, माझ्या मते आम्ही ही परिस्थिती बदलू शकतो. संघ आणि मी एक मानसिकता बनवली असून यामुळे आम्हाला कोणत्याही दबावाची जाणीव होत नाही.-लसिथ मलिंगा, हंगामी कर्णधार श्रीलंका-उभय संघ यातून निवडणार भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर.श्रीलंका : लसिथ मलिंगा (कर्णधार), धनंजया डिसिल्व्हा, दिलशान मुनावीरा, लाहिरू थिरीमन्ने, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुशल मेंडिस, मिलिंदा सिरिवर्धना, मलिंदा पुष्पकुमारा, अकिला धनंजया, लक्षण संदाकन, थिसारा परेरा, वानिंदू हसरंगा, दुष्मंता चामीरा, विश्वा फर्नांडो, उपुल थरंगा.

टॅग्स :क्रिकेट