IND vs WI ODI : वेस्ट इंडिजविरूद्धच्या वन डे मालिकेतील सलामीचा सामना जिंकून पाहुण्या भारतीय संघाने विजयी सलामी दिली. पहिल्या सामन्यात ५ गडी राखून विजय मिळवत रोहितसेनेने विजयरथ कायम ठेवला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीच्या जोरावर भारताने विजय साकारला. जड्डूने ६ षटकांत केवळ ३७ धावा देऊन ३ बळी घेतले, तर कुलदीप यादवने ३ षटकांत ६ धावा देऊन ४ बळी घेतले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारतीय संघाने यजमानांना २३ षटकांत ११४ धावांवर सर्वबाद केले.
११५ धावांच्या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून इशान किशनने (५२) अर्धशतकी खेळी केली. भारतीय संघाने २२.५ षटकांत ५ गडी गमावून ११८ धावा केल्या अन् तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. विंडिजविरूद्धच्या शानदार विजयानंतर रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी आपल्या चमकदार कामगिरीबद्दल भाष्य केले. भारतीय शिलेदारांनी एकमेकांसह संघाचे तोंडभरून कौतुक केले.
भारताची विजयी सलामीबीसीसीआने शेअर केलेल्या व्हिडीओत कुलदीप यादवने म्हटले, "वेगवान गोलंदाजांनी भारताला चांगली सुरूवात करून दिली. पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या मुकेश कुमारने चांगली गोलंदाजी केली. नंतर जड्डूने लवकर बळी घेऊन प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकला. सर्वकाही चांगले झाले आणि आम्ही सांघिक कामगिरी केली."
तर, जडेजाने सांगितले की, आम्ही धावा कमी देण्याच्या प्रयत्नात होतो. कारण जेव्हा भारत फलंदाजी करत होता तेव्हा परिस्थिती वेगळी होती, चेंडू उसळी घेत होता, फलंदाजांच्या अडचणी वाढवत होता. खरं तर वेस्ट इंडिजच्या डावाच्या अठराव्या षटकात जड्डूच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने अप्रतिम झेल घेतला. स्लीपच्या इथे उभा असलेल्या विराटने रोमारियो शेफर्डचा झेल घेऊन सर्वांचे लक्ष वेधले. याबद्दल बोलताना जड्डूने म्हटले, "मी अनेकांच्या गोलंदाजीवर अशा कॅचेस घेत असतो. पण माझ्या गोलंदाजीवर देखील कोण असा झेल पकडू शकतो हे पाहून आनंद वाटतो. तो खूपच अप्रतिम झेल होता. अशावेळी क्षेत्ररक्षकाची साथ असल्यास गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो."