मुंबई: भारताच्या 'अ' संघाने वेस्टइंडीज 'अ' संघाचा पाच सामनांच्या मालिकेत ४-१ अशा फरकाने धुव्वा उडवला आहे. भारताने पाचव्या वनडेत ऋतुराज गायकवाडच्या ९९ व शुभमन गिलच्या ६९ धावाच्या जोरावर वेस्टइंडीजवर ८ विकेट्स राखून विजय मिळवला आणि मालिकेवर शिक्कामोर्तब केले.
या सामन्यात वेस्टइंडीजने टॅास जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ४७.४ षटकात सर्वबाद २३६ धावा केल्या. भारताने २३७ धावांचे लक्ष्य ३३ षटकांतच पूर्ण करत विजय मिळविला.
भारताने या मालिकेत पहिले तीन सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली होती. त्यानंतर चौथ्या सामन्यात भारतीय संघाला ५ धावांनी पराभव स्विकारावा लागला होता. वेस्टइंडीजचा हा या मालिकेतील एकमात्र विजय ठरला होता.
वेस्टइंडीजने सुनील अंबरीस ६१ धावा आणि कर्जन ओटलेच्या २१ धावांच्या जोरावर चांगली सुरुवात केली. या दोघांनी ७७ धावांची दमदार सलामी दिली. त्यानंतर १४ व्या षटकात नवदीप सैनीने ओटलेची विकेट घेऊन भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर वेस्टइंडीजचे सर्व फलंदाज झटपट माघारी परतले.
वेस्ट इंडिजच्या धावांचा पाठालाग करताना भारताकडून ऋतुराज गायकवाडने ९९ धावा व शुभमन गिलने ६९ धावा केल्या. तसेच श्रेयस अय्यरने ६१ धावा करत विजयात मोलाचा वाटा उचलला.