कोलंबो, दि. 6 - रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावात केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेवर एक डाव आणि 53 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. रवींद्र जाडेजाला मॅन ऑफ द मॅचचा खिताब बहाल करण्यात आला आहे. फलंदाजीमध्ये पुजारा आणि रहाणेची शतके आणि गोलंदाजीमध्ये पहिल्या डावात अश्विन आणि दुसऱ्या डावात जडेजाने केलेली भेदक गोलंदाजी हे भारताच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले.
पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकणा-या श्रीलंकन फलंदाजांनी दुस-या डावात ब-यापैकी प्रतिकार केला. कुशल मेंडिस आणि दिमुथ करुणारत्नेच्या शतकांच्या जोरावर यजमान संघाने भारताची चिंता वाढवली होती. पण दोन्ही शतकवीर बाद झाल्यावर लंकेचा डाव धडाधड कोसळला. करुणरत्नेला पुष्पकुमारानं चांगली साथ दिल्यामुळे त्यानं शतकही साजरं केलं. रविचंद्रन अश्विननं त्याला बाद करत माघारी पाठवलं. त्यानंतर रवींद्र जाडेजानं कर्णधार दिनेश चंडीमलला रहाणेला झेल द्यायला भाग पाडत श्रीलंकेला चौथा धक्का दिला. त्यामुळे करुणरत्नेला एकाहाती किल्ला लढवावा लागला. करुणरत्नेनं 307 चेंडूंत 141 धावांची खेळी केली. करुणरत्नेनं 16 चौकार लगावले आहेत. करुणरत्ने आणि अँजलो मॅथ्यूजनं पाचव्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. त्यामुळे सामना श्रीलंकेकडे झुकतोय असं वाटत असतानाच जाडेजाने करुणरत्नेचा बळी घेतला. जाडेजाच्या गोलंदाजीवर अँजलो मॅथ्यूज साहाकडे झेल देऊन तंबूत परतला. निरोशन डिकवेला आणि धनंजय डिसिल्वा यांनी चांगली खेळी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तेसुद्धा शेवटपर्यंत मैदानावर टिकू शकले नाहीत. अखेर भारतानं या मालिकेवर विजय मिळवला आहे.
तत्पूर्वी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतर सलामीवीर उपुल थरंगा (2) लगेच बाद झाल्यामुळे श्रीलंकेचा दुसरा डावही अडचणीत येईल असे वाटत होते. पण करुणारत्ने आणि मेंडीसने श्रीलंकेचा डाव सावरला. दोघांनी दुस-या विकेटसाठी 191 धावांची भागीदारी केली. दुस-या डावात श्रीलंकेकडून कुसल मेंडीसने (110) शानदार शतक झळकवले. सलामीवर करुणारत्ने (92) धावांवर नाबाद राहिला होता. तिस-या दिवस अखेर श्रीलंकेच्या दोन बाद 209 धावा झाल्या होत्या. भारताने आपला पहिला डाव 9 बाद 622 धावांवर घोषित केल्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 183 धावात आटोपला होता.
Web Title: india win shrilanka by 53 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.