लीड्स : कर्णधार श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि इशान किशन यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारत ‘अ’ संघाने इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ईसीबी) एकादशविरुद्ध १२५ धावांनी धडाकेबाज विजयासह आपल्या ब्रिटन दौऱ्याची शानदार सुरुवात केली आहे.
शॉने ६१ चेंडूंत ७० धावा, अय्यरने ४५ चेंडूंत ५४ धावा आणि किशनने ४६ चेंडूंत ५० धावा केल्या. या फलंदाजांच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३२८ धावा फटकावल्या. त्यानंतर भारतीय संघाने ईसीबी एकादशला ३६.५ षटकांत २०३ धावांत गुंडाळले. दीपक चाहरने धारदार गोलंदाजी करताना ४८ धावांत ३ बळी घेतले. हा भारतीय संघाचा या दौºयातील पहिला सामना होता. त्यानंतर आता भारतीय संघ २२ जून रोजी ५० षटकांच्या तिरंगी मालिकेत सहभागी होणार आहे. या मालिकेत इंग्लंड लायन्स व वेस्ट इंडीज ‘अ’ संघ सहभागी असून भारत ‘अ’ जुलैमध्ये वेस्ट इंडीज ‘अ’ व इंग्लंड लायन्सविरुद्ध कसोटी खेळणार आहे.
या सामन्यात ईसीबीने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली आणि सलामीवीर मयंक अग्रवाल (४) लवकर बाद झाला; परंतु त्याचा जोडीदार शॉ चांगल्या लयीत होता. पृथ्वी शॉ ने ७ चौकार व ३ षटकार मारले. अय्यर, किशन यांनी रेयान हिगिन्सच्या गोलंदाजीवर सलग चेंडूवर बाद होण्याआधी ९९ धावांची भागीदारी केली. रेयानने ५० धावांत ४ गडी बाद केले. संजू सॅमसन ऐवजी संघात समाविष्ट करण्यात आलेल्या किशनने संधीचा पुरेपूर फायदा घेताना चार चौकार व २ षटकार मारले. कृणाल पांड्या (३४) व अक्षर पटेल (नाबाद २८) यांनी डेथ ओव्हरमध्ये उपयुक्त धावा फटकावल्याने भारताला ३०० धावांचा पल्ला पार करता आला. प्रत्युत्तरात ईसीबी संघ बेन स्लेटर (३७) आणि विल जॅक (२८) हे बाद झाल्यानंतर विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचण्याच्या स्थितीत दिसला नाही. मॅट क्रिचली याने संघाकडून सर्वाधिक ४० धावा केल्या. भारताकडून चाहरशिवाय अक्षर पटेलने २१ धावांत २ गडी बाद केले. (वृत्तसंस्था)
>संक्षिप्त धावफलक
भारत ‘अ’ : ५० षटकात ८ बाद ३२८ धावा (पृथ्वी शॉ ७०, श्रेयस अय्यर ५४, इशान किशन ५०; रायन हिगिंस ४/५०) वि.वि. ईसीबी ‘अ’ : ३६.५ षटकात सर्वबाद २०३ धावा (मॅट क्रिचली ४०, बेन स्लेटर ३७; दीपक चाहर ३/४८.)
Web Title: India A's winning start, Iyer, Shaw, Kishan's half century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.