Join us

भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध २-१ ने मालिका विजय; रिचा घोषने झळकावले वेगवान अर्धशतक

भारताने महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा द्विशतक झळकावताना आपली सर्वोत्तम धावसंख्या उभारली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2024 09:54 IST

Open in App

रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : भारतीय महिला संघाने गुरुवारी तिसऱ्या व अखेरच्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजला ६० धावांनी नमवत तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर २० षटकांत ४ बाद २१७ धावा उभारलेल्या भारताने विंडीजला २० षटकांत ९ बाद १५७ धावांवर रोखले. भारताच्या रिचा घोषने वेगवान आंतरराष्ट्रीय टी-२० शतक झळकावत हा सामना गाजवला.

डीवाय पाटील स्टेडियमवर भारताने दिलेल्या भल्यामोठ्या धावसंख्येचे आव्हान वेस्ट इंडिजला पेलवले नाही. चिनेले हेन्री हिने १६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ४३ धावा फटकावून एकाकी झुंज दिली. इतर फलंदाज मात्र दडपणात अपयशी ठरले. पहिल्या दोन सामन्यांत खराब क्षेत्ररक्षण केलेल्या भारतीयांनी अखेरच्या सामन्यात मात्र कमालीची सुधारणा करत प्रभावित केले. राधा यादवने ४ बळी घेत विंडीजचे कंबरडे मोडले. त्याआधी, स्मृती मानधना आणि रिचा घोष यांच्या जोरावर भारताने महिला आंतरराष्ट्रीय टी-२० मधील आपली सर्वोत्तम धावसंख्या उभारली. स्मृतीने सलग तिसरे आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक झळकावले. असा पराक्रम करणारी ती दुसरी भारतीय महिला फलंदाज ठरली. दुसरीकडे, रिचाने केवळ १८ चेंडूंत अर्धशतक झळकावले. यासह तिने महिला आंतरराष्ट्रीय टी-२० मधील संयुक्तपणे सर्वात वेगवान अर्धशतकही ठोकले.

भारताने महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा द्विशतक झळकावताना आपली सर्वोत्तम धावसंख्या उभारली.

हरमनप्रीतची दुखापत कायम

गुडघादुखी कायम राहिल्याने कर्णधार हरमनप्रीत कौर वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यातही खेळू शकली नाही. यामुळे सलग दुसऱ्या सामन्यात स्मृती मानधनाने भारताचे नेतृत्व केले.

स्मृती आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सलग तीन अर्धशतक झळकावणारी मिताली राजनंतरची केवळ दुसरी भारतीय महिला ठरली.

सामनावीर रिचा घोषने महिला टी-२० मध्ये सोफी डीव्हाईन (न्यूझीलंड) आणि फिबे लिचफील्ड (ऑस्ट्रेलिया) यांच्यासह प्रत्येकी १८ चेंडूंत सर्वांत वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विश्वविक्रम नोंदवला.

संक्षिप्त धावफलक भारत : २० षटकांत ४ बाद २१७ धावा (स्मृती मानधना ७७, रिचा घोष ५४, जेमिमा रॉड्रिग्ज ३९, राघवी बिष्ट नाबाद ३१; चीनेले हेन्री १/१४, अॅफी फ्लेचर १/२४, अलियाह अलेयनी १/४५, डीएंड्रा डॉट्टीन १/५४.) वि. वि. वेस्ट इंडिज : २० षटकांत ९ बाद २५७ धावा (चिनेले हेन्री ४३, डीएंड्रा डॉट्टीन २५, हेली मॅथ्यूज २२; राधा यादव ४/२९.)

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघवेस्ट इंडिज