INDW vs SAW : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील दुसरी वन डे मॅच कमालीची चुरशीची झाली. भारतीय महिलांनी उभ्या केलेल्या ३२५ धावांचा आफ्रिकेकडून यशस्वी पाठलाग होताना दिसला. पण, २०व्या षटकात पूजा वस्त्राकरने दोन विकेट घेऊन गमावलेली मॅच खेचून आणली. या सामन्यात स्मृती मानधना ( १३६), हरमनप्रीत कौर ( १०३*), मॅरिझाने कॅप ( ११४) आणि लॉरा वोल्व्हार्ड्ट ( १०३*) यांनी शतक झळकावले. महिला वन डे सामन्यात प्रथमच चार फलंदाजांनी शतक झळकावण्याचा पराक्रम केला गेला. यापूर्वी २०१८ मध्ये इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका लढतीत तीन शतकं झळकावली गेली होती. दक्षिण आफ्रिकेने आज भारताविरुद्धचा सामना अवघ्या ४ धावांनी गमावला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
प्रत्युत्तरात, तझमिस ब्रिट्स ( ५), आन्नेके बॉश ( १८) व सून ल्यूस ( १२) यांना माघारी पाठवून दक्षिण आफ्रिकेची अवस्था ३ बाद ६७ अशी झाली होती. पण, कर्णधार लॉरा वॉल्व्हार्ड्ट आणि अनुभवी मॅरिझाने कॅप यांनी चौथ्या विकेटसाठी १८४ धावांची भागीदारी करून सामना चुरशीचा बनवला. दीप्ती शर्माने ही भागीदारी तोडली. कॅप ९४ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ११४ धावांवर माघारी परतली. पण, कर्णधार लॉरा मैदानावर उभी राहिली होती. शेवटच्या १२ चेंडूंत २३ धावांची गरज असताना १९व्या षटकात आफ्रिकेने १२ धावा मिळवल्या.