INDWvsMALW Live : आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मोहिमेला आजपासून सुरूवात झाली. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मलेशियाने नाणेफेक जिंकून भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. स्मृती मानधना हिला मोठी खेळी करता आली नसली तरी शफाली वर्मा ( Shafali Verma )ने ऐतिहासिक कामगिरी केली. तिने जेमिमा रॉड्रीग्जसह भारताला मोठे लक्ष्य उभारून दिले.
हरमनप्रीत कौर कॅप्टन असूनही संघाबाहेर! स्मृती मानधनाकडे नेतृत्व, जाणून घ्या प्रकरण
कर्णधार हरमनप्रीत कौरवर दोन सामन्यांची बंदी असल्याने स्मृती मानधना संघाचे नेतृत्व सांभाळतेय. मानधना आणि शफाली वर्मा या दोघींनी भारताला आक्रमक सुरूवात करून दिली. ५.२ षटकांत फलकावर ५७ धावा चढवल्यानंतर मानधना २७ धावांवर ( १६ चेंडू व ५ चौकार) झेलबाद झाली. ५.४ षटकांचा खेळ झालेला असताना पावसामुळे मॅच थांबवावी लागली. पावसामुळे बराच वेळ वाया गेल्याने १५-१५ षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय झाला.
शफाली आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांना जोरदार फटकेबाजी केली. आशियाई स्पर्धेत अर्धशतक झळकावणाऱ्या पहिल्या भारतीय क्रिकेटपटूचा मान शफालीने आज पटकावला. तिने ३९ चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने ६७ धावांची खेळी केली आणि जेमिमासह दुसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूंत ८६ धावा जोडल्या. १३व्या षटकात शफाली LBW झाली. त्यानंतर जेमिमाने मोर्चा सांभाळला अन् संघाला १५ षटकांत २ बाद १७३ धावा उभारून दिल्या. जेमिमा २९ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ४७ धावांवर नाबाद राहिली, तर रिचा घोषने ७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद २१ धावा केल्या.