भारतीय महिला संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडमहिला संघाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यासाठी मैदानात उतरला आहे. १-१ बरोबरीत असलेल्या मालिकेतील निर्णायक लढतीत न्यूझीलंड महिला संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.
जेमिमा रॉड्रिग्ज उत्तम थ्रो मारत सुझीला केलं रन आउट
सुझी बेट्स (Suzie Bates) आणि जॉर्जिया प्लिमर (Georgia Plimmer) या सलामी जोडीनं न्यूझीलंडच्या डावाला सुरुवात केली. न्यूझीलंडच्या धावफलकावर अवघ्या २४ धावा असताना सुझी बेट्सच्या रुपात भारतीय महिला संघाने न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. जेमिमा रॉड्रिग्जनं उत्तम थ्रो करत सुझीला रन आउट केले. ती १४ चेंडू खेळून फक्त ४ धावांवर माघारी फिरली.
याआधीही जेमिमाला मिळाली होती तिला रन आउट करण्याची संधी, पण...
सुझी बेट्स (Suzie Bates) आणि जॉर्जिया प्लिमर (Georgia Plimmer) या जोडीत ताळमेळाचा अभाव दिसण्याची या सामन्यातील ही दुसरी वेळ होती. याआधी न्यूझीलंडच्या डावातील रेणुका सिंह घेऊन आलेल्या तिसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवरही या जोडीत गडबड घोटाळा दाखवणारा सीन निर्माण झाला होता. विशेष म्हणजे यावेळीही चेंडू हा जेमिमा रॉड्रिग्सकडेच गेला होता. पण त्यावेळी तिचा थ्रो थोडा उशीरा आला अन् सुझी बेट्सनं आपली विकेट वाचवली होती.
काही वेळातच सुधारली चूक अन् ...
पण दुसऱ्या वेळी मात्र जेमिमा रॉड्रिग्सनं पहिली चूक केली नाही. फिल्डिंगमधील सर्वोत्तम दर्जा दाखवून देत जेमिमानं काही क्षणात आपली पहिली चूक भरून काढली. तिने भारतीय संघाला पहिलं यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. जेमिमानं यष्टीमागे उभी असलेल्या याश्तिका भाटियासोबत कमालीचा ताळमेळ दाखवत सुझी बेट्सचा खेळ खल्लास केला.
निर्णायक लढतीत भारतीय महिला संघाची मजबूत पकड
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध विजय नोंदवत भारतीय महिला संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती. पण दुसरा सामना जिंकत न्यूझीलंडच्या संघानं मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा गोलंदाजी करताना सामन्यावर पकड मिळवल्याचे दिसत आहे.
Web Title: India Women vs New Zealand Women, 3rd ODI Excellent throw from Jemimah Rodrigues to get the important wicket of Suzie Bates for 4 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.