पल्लीकल : पहिला एकदिवसीय सामना सहजपणे जिंकल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ सोमवारी दुसरा एकदिवसीय सामना जिंकून यजमान श्रीलंकेविरुद्ध विजयी आघाडी घेण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. मात्र, यावेळी भारताला आपल्या आघाडीच्या फलंदाजांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. याआधी झालेली तीन टी-२० सामन्यांची मालिकाही भारताने २-१ अशी जिंकली होती.
कमी धावसंख्येच्या झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीयांनी चार बळींनी बाजी मारत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. परंतु. उपकर्णधार स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्याकडून झालेल्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीयांवरील चिंता वाढली आहे. या दौऱ्यात या दोघींकडून अद्याप एकही मोठी भागीदारी झालेली नाही. त्यामुळेच आता या दोघींच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. दुसरीकडे, कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांना प्रभावित केले आहे. तिने फलंदाजीत चमकदार कामगिरीसह आपल्या पर्यायी गोलंदाजीने बळीही मिळवले आहेत.