महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात भारताच्या सलामी जोडीनं संघाला एकदम धमाकेदार सुरुवात करून दिली. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या दोघींनी पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी रचली. ही जोडी फोडणं श्रीलंकन महिला संघासाठी जवळपास मुश्किल झालं होतं. पण शतकी भागीदारीच्या उंबरठ्यावर असताना स्मृती मानधनाच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला.
फिफ्टीसह टी-२० वर्ल्ड कपमध्ये स्मृतीनं साधला ५०० धावा करण्याचा डाव
स्मृती मानधना रन आउटच्या रुपात बाद झाली. अवघ्या मिली मीटरच्या अंतरानं ती क्रिजपासून दूर राहिली. परिणामी भारतीय महिला संघाने पहिली विकेट गमावली. आउट होण्यापूर्वी स्मृती मानधानं अर्धशतक पूर्ण केले होते. तिने आपल्या अर्धशतकी खेळीत ४ खणखणीत चौकार आणि एक उत्तुंग षटकार मारला. तिने मारलेला हा षटकार यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून लगावलेला पहिला सिक्सर ठरला. याशिवाय स्मृती मानधनानं टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ५०० धावांचा पल्लाही पार केला.
१३ व्या षटकात खेळच बदलला
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नेट रन रेट सुधारण्याच्या चॅलेंज टीम इंडियासमोर होते. कर्णधार हरमप्रीत कौरनं नाणफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय स्मृती-शेफाली जोडीनं एकदम सार्थ ठरवला. दोघींनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. अखेरच्या षटकात दोघींकडून तुफान फटकेबाजी पाहायला मिळेल, अशी आशा होती. पण १३ व्या षटकात खेळच बदलला. चामरी अट्टापटू घेऊन आलेल्या भारताच्या डावातील १३ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर शेफाली वर्मानं एक धाव घेत स्मृतीला स्टाइक दिले. दुसऱ्या चेंडूवर स्मृतीनं खणखणीत चौकार मारत अर्धशतक पूर्ण केले. तिसरा चेंडू निर्धाव खेळल्यावर चोरटी धाव घेण्याचा तिचा प्रयत्न फसला.
दोघींच्यात आहे कमालीचा ताळमेळ, पण त्यात थोडा अभाव दिसला अन्
स्मृती आणि शेफाली ही जोडी क्रिकेट जगतातील सर्वात स्फोटक आणि यशस्वी जोडी आहे. यामागचं कारण दोघींमध्ये असणारा कमालीचा ताळमेळ हेच आहे. पण यावेळी त्यात अभाव दिसला अन् स्मृतीला रन आउटच्या रुपात विकेट गमवावी लागली. ती बाद झाल्यावर पुढच्याच चेंडूवर शेफालीही आउट झाली. शेफालीनं ४०चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ४३ धावांची खेळी केली.
Web Title: India Women vs Sri Lanka Women Smriti Mandhana Unfortunate Run Out After Brilliant 50 completes 500 Runs in Womens T20 World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.