Harleen Deol Slams Her Maiden International Century : भारतीय महिला क्रिकेट संघातील उदयोन्मुख स्टार हरलीन देओलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपलं पहिलं शतक साजरे केले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या बडोद्याच्या कोटंबी स्टेडियमवर तिने वनडेतील अविस्मरणीय खेळी साकारली. हरलीन हिने या सामन्यात १६ चौकाराच्या मदतीने १०३ चेंडूत ११५ धावांची दमदार खेळी केली.
सलामी जोडीनं सेट करुन दिला होता प्लॅटफॉर्म; हरलीनं दिला आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील बेस्ट परफॉमन्स
स्मृती मानधना आणि प्रतिका रावल या भारताच्या सलामी जोडीनं संघाला दमदार सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी ११० धावांची दमदार भागीदारी रचली. स्मृती मानधनानं रनआउटच्या रुपात विकेट गमावल्यावर हरलीन देओल फलंदाजीसाठी मैदानात उतरली. तिने अप्रतिम खेळीचा नजराणा पेश करताना आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या शतकाला गवसणी घातली.
याआधी ७७ धावांची खेळी वगळता कधीच दिसला नाही तोरा, तरीही कॅप्टन हरमनप्रीत कौरनं तिच्यावर दाखवला भरवसा
आपल्या वनडे कारकिर्दीत हरलीन देओल हिने याआधी १५ वनडे सामन्यात ४३६ धावा केल्या होत्या. ७७ ही तिची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या होती. पण आता पहिल्या शतकासह तिने ११५ ही आपली सर्वोच्च वनडे धावसंख्या केली आहे. वनडेशिवाय हरलीन हिने टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून २४ सामने खेळले आहेत. क्रिकेटच्या या छोट्या प्रारुपामध्ये हरलीनच्या खात्यात २५१ धावांची नोंद आहे. हरलीन देओल हिने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली होती. पण कॅप्टन हरमनप्रीत कौरनं तिच्यावरील विश्वास कायम ठेवत तिला सातत्याने संघात स्थान दिले. अखेर हा विश्वास तिने सार्थ ठरवला आहे.
हरलीनच्या शतकी खेळीसह तिघींच्या भात्यातून आली अर्धशतके, भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
हरलीन देओलच्या शतकी खेळीशिवाय वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात जेमिमा रॉड्रिग्ज हिने ३६ चेंडूत केलेली ५२ धावांची खेळी आणि प्रतिका रावल ७६(८६) आणि स्मृती मानधना ५३ (४७) यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात निर्धारित ५० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात ३५८ धावां केल्या.