Join us  

वॉशिंग्टनच्या रुपाने भारताला ‘सुंदर’ खेळाडू मिळाला

बुधवारी बांगलादेशचा पराभव करुन भारताने तिरंगी टी२० मालिकेच्या अंतिम सामन्यातील आपला प्रवेश निश्चित केला. भारताने १७ धावांच्या कमी फरकाने विजय मिळवला असला, तरी हा चांगला विजय होता. भारताने उभारलेल्या १७६ धावा फार कठीण लक्ष्य नव्हते, मात्र तरीही भारत हा सामना हरेल असे कुठेही जाणवले नाही हे विशेष.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:21 AM

Open in App

- अयाझ मेमनबुधवारी बांगलादेशचा पराभव करुन भारताने तिरंगी टी२० मालिकेच्या अंतिम सामन्यातील आपला प्रवेश निश्चित केला. भारताने १७ धावांच्या कमी फरकाने विजय मिळवला असला, तरी हा चांगला विजय होता. भारताने उभारलेल्या १७६ धावा फार कठीण लक्ष्य नव्हते, मात्र तरीही भारत हा सामना हरेल असे कुठेही जाणवले नाही हे विशेष. फलंदाजीला पूरक असलेल्या परिस्थितीमध्येही भारतीय गोलंदाजांनी आपली क्षमता सिद्ध केली. तसेच कर्णधार रोहित शर्माही खूप आनंदी दिसत होता, कारण त्याच्याकडे पर्याय खूप होते. फिरकीपटू, वेगवान यांच्यासह पर्यायी गोलंदाजांचाही पर्याय त्याच्याकडे होता. शिवाय गोलंदाज फॉर्ममध्येही होते. विशेष करुन वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर हे युवा गोलंदाज चांगल्या लयीमध्ये होते. तरी, मुशफिकुर रहीम ज्याप्रकारे खेळत होता ते पाहता एकवेळ वाटत होते की भारताला हा सामना अडचणीचा ठरेल. पण रहिमला पुरेपुर साथ मिळाली नाही. त्याने पुन्हा एकदा अप्रतिम ७२ धावांची खेळी केली, पण तो संघाला विजयी करु शकला नाही. भारतासाठी सलामी जोडीने चांगली कामगिरी केली. धवन तर फॉर्ममध्ये आहेच, पण सुरेश रैनानेही चांगल्या धावा केल्या. तो केवळ ३ धावांनी अर्धशतकापासून दूर राहिला. तरी एकवेळ भारत मजबूत धावसंख्या रचेल असे वाटत होते, पण अखेरच्या क्षणांमध्ये वेगाने धावा झाल्या नाहीत.खेळाडूंच्या बाबतीत सर्वप्रथम कौतुक करावे लागेल ते रोहित शर्माचे. पूर्ण मालिकेत तो चाचपडताना दिसला, पण या सामन्यात रोहितने ८९ धावांची धमाकेदार खेळी केली. रोहितचे हेच वैशिष्ट्य राहिले आहे. त्याच्याकडून सुरुवातीला सातत्याने कमी धावा होतात आणि त्यानंतर त्याच्या खेळण्यावर टीका होऊ लागली की, अचानक रोहित एक चमत्कारीक खेळी खेळतो. असे असले तरी ज्या ८९ धावांसाठी त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला ते पाहता हा पुरस्कार खरं म्हणजे वॉशिंग्टन सुंदरला मिळाला पाहिजे होता, असे मला वाटते. या गुणवात युवा आॅफस्पिनरने बांगलादेशचे पहिले तीन बळी मिळवले. या जोरावरच भारताने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. चांगल्याप्रकारे फलंदाजी तसेच गोलंदाजी करण्याची क्षमता असलेल्या सुंदरच्या रुपाने भारताला एक शानदार खेळाडू लाभला आहे. गतवर्षी आयपीएलमध्येही सुंदरने चांगली कामगिरी केली होती. इथे भारतासाठी खेळतानाही त्याने छाप पाडली आहे. १८ वर्षाच्या खेळाडूसाठी अशी चमकदार कामगिरी करणे सोपे नसते. अशा वेळी मानसिक दबाव असतो. पण सुंदरकडे परिपक्वताही आहे आणि गुणवत्ताही आहे. त्यामुळे सामनावीर न ठरल्याचे दु:ख असले, तरी संघातील जागा भक्कम केल्याचे समाधान नक्की आहे.(संपादकीय सल्लागार)