Join us  

भारताची विजयी सलामी; पृथ्वी, इशानचे वादळ घोंघावले

आर. प्रेमदासा स्टेडिअममध्ये भारताच्या डावाची सुरुवात सलामीवीर पृथ्वी शॉ याने थाटात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 7:44 AM

Open in App

कोलंबो : आर. प्रेमदासा स्टेडिअममध्ये भारताच्या डावाची सुरुवात सलामीवीर पृथ्वी शॉ याने थाटात केली. त्याने २४ चेंडूतच ४३ धावा चोपल्या. त्याने करुन दिलेल्या तुफानी सुरुवातीच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान श्रीलंकेचा ७ गड्यांनी पराभव केला. इशान किशनने ४२ चेंडूत ५९ धावा फटकावल्या. लंकेच्या ५० षटकांत ९ बाद २६२ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने ३६.४ षटकांत ३ बाद २६३ धावा केल्या.

कर्णधार म्हणून विजयी सुरुवात केलेल्या शिखर धवनने अखेरपर्यंत नाबाद राहताना ९५ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह नाबाद ८६ धावा करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. मात्र, जोरदार सुरुवात करुन दिलेल्या पृथ्वीच्या जोरावर भारताचा विजय सुकर झाला. पृथ्वीलाच सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. 

डावाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर दुश्मंथा चमिरा याला सलग दोन चौकार लगावले.  त्याने  २४ चेंडूत ४३ धावा करताना ९ चौकार लगावले.  एका बाजूने शिखर धवन संयमी खेळी करत असतानाच पृथ्वीने आपले जोरदार आक्रमण केले. ५८ धावांच्या भागीदारीत ४३ धावा एकट्या पृथ्वीने केल्या. त्याने चौथ्या षटकांतही इसरु उदानाला सलग तीन चौकार लगावले. अखेर धनंजय डिसिल्वाने त्याला बाद केले. मात्र इशान किशननेही लंकेची चांगलीच परीक्षा घेतली. पृथ्वी बाद झाल्यावर इशानने पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. इशानने आपल्या अर्धशतकी खेळीत दोन षटकार व ८ चौकार मारले. त्याने कर्णधार धवनसह ८५ धावांची भागीदारी केली. किशनही बाद झाल्यानंतर धवनने अखेरपर्यंत टिकून राहताना जबाबदारीने खेळत भारताचा विजय साकारला.

त्या आधी दीपक चहर सोबतच कुलदीप यादव, युझवेंद्र चहल यांच्या शानदार गोलंदाजीने भारताने श्रीलंकेला ९ बाद २६२ धावांवर रोखले. चहरने ३७ धावांवर दोन बळी घेतले, तर कुलदीपने ४८ धावा देत आणि चहलने ५२ धावा देत प्रत्येकी दोन बळी घेतले.  कृणाल पांड्याने फक्त २६ धावा देऊन एक बळी घेतला. भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर श्रीलंकेने नियमित अंतरात बळी गमावले. यजमानांकडून कोणालाही अर्धशतक करता आले नाही.

चमिका करुणारत्ने याने नाबाद ४३ धावा केल्या. तर कर्णधार दासुन शनाका (३९) चरथ असालांका (३८)आणि अविष्का फर्नांडो (३२) यांनी देखील उपयोगी खेळी केली. लंकेचा कर्णधार दासुन शानका याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फर्नांडो आणि मिनोद भानुका यांनी ९.१ षटकांत ४९ धावांची भागिदारी केली. चहर आणि भुवनेश्वर दोघांना बॉल स्विंग करण्यात यश आले. मात्र गडी बाद करता आला नाही. धवन याने दहाव्या षटकात फिरकी गोलंदाजाला संधी दिली.

महत्त्वाचे :

- इंग्लंडमध्ये २०१९ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच कुलदीप यादव व युझवेंद्र चहल एकाचवेळी भारतीय संघातून खेळले.

- भारताचे नेतृत्त्व करणारा शिखर धवन सर्वात वयस्कर कर्णधार ठरला. ३५ वर्षे आणि २२५ दिवस असे वय असताना धवनला कर्णधारपद मिळाले असून याआधी मोहिंदर अमरनाथ यांनी ३४ वर्षे आणि ३७ दिवसांचे असताना भारताचे नेतृत्त्व केले होते.

- धवनने कारकिर्दीतील १४२ व्या एकदिवसीय सामन्यात कर्णधारपद सांभाळले असून अनिल कुंबळेला २१७, तर रोहित शर्माला १७१ सामन्यानंतर अशी संधी मिळाली होती. राहुल द्रविडने १३८ सामन्यानंतर कर्णधारपद सांभाळले होते.

- एकही अर्धशतक न झळकावत श्रीलंकेने एका डावात सर्वाधिक धावा केल्या. याआधी २००६ साली पाकविरुद्ध एकही अर्धशतकाविना श्रीलंकेने २५३ धावा केलेल्या.

वाढदिवसाला पदार्पण करणारा ईशान दुसरा क्रिकेटपटू

आयपीएलमध्ये जबरदस्त लक्ष वेधलेल्या युवा यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन याला आपल्या वाढदिवसाच्याच दिवशी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे असे पदार्पण करणारा तो केवळ दुसराच भारतीय खेळाडू ठरला. याआधी भारताचे माजी क्रिकेटपटू गुरशरण सिंग यांनी आपल्या वाढदिवसाला ८ मार्च १९९० रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. हॅमिल्टन येथील हा सामना गुरशरण यांचा पहिला आणि अखेरचा एकदिवसीय सामना ठरला होता. ईशान आणि सूर्यकुमार यांनी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले. योगायोग म्हणजे याआधी इंग्लंडविरुद्धही दोघांनी एकाच वेळी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १८ जुलै १९९८ रोजी पाटना येथे जन्मलेल्या ईशानने दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळताना ६० धावा काढल्या असून, यामध्ये एक खणखणीत अर्धशतकही आहे.

ध‌वनच्या सहा हजार धावा

शिखर धवन याने आपल्या खेळीत सहा हजार धावा केल्या. त्याने १४० एकदिवसीय डावांमध्ये सहा हजार धावांचा टप्पा गाठला. त्यासोबतच श्रीलंकेविरोधात कमी सामन्यांमध्ये १००० धावा पुर्ण करणारा शिखर धवन हा अव्वल फलंदाज ठरला. त्याने १७ सामन्यात ही कामगिरी  या बाबतीत त्याने माजी कर्णधार सौरव गांगुली (२० सामने)  मागे टाकले आहे.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : ५० षटकांत ९ बाद २६३ धावा (चमिका करुणारत्ने ४३*, दासुन शनाका ३९; दीपक चहर २/३७, कुलदीप यादव २/४८, युझवेंद्र चहल २/५२) पराभूत वि. भारत : ३६.४ षटकांत ३ बाद २६३ धावा (शिखर धवन ८६*, ईशान किशन ५९; धनंजय २/४०.)

टॅग्स :भारतश्रीलंका