IND vs SA Live Scorecard : रोहित शर्माने ( Rohit Sharma) अखेर टीम इंडियाचा ११ वर्षांचा आयसीसी स्पर्धेतील जेतेपदाचा दुष्काळ संपवला. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये बाजी मारली. २००७ नंतर भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आहे. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून विजय मिळवताना रडताना दिसला. एकवेळ अशी आलेली की भारताने ही मॅच गमावली होती, परंतु हार्दिक पांड्याने निर्णायक विकेट घेतली आणि जसप्रीत बुमराह व सूर्यकुमार यादव यांनी सामन्याला पूर्ण कलाटणी दिली.
रोहित शर्मा काय म्हणाला... रोहित शर्मा, "गेल्या तीन-चार वर्षांत आम्ही काय अनुभवले आहे, हे सांगणे कठीण आहे. पडद्यामागील बरेच काही आहे, आम्ही आज जे केले ते बऱ्याच वर्षांची मेहनत आहे. अनेक दडपणाचे सामने आम्ही खेळले आणि त्यावेळी आम्ही चुकीच्या बाजूला राहिलो. दडपण असताना काय करावे, हे या खेळाडूंना चांगल्या पद्धतीने माहित्येय. आज त्याचे एक परिपूर्ण उदाहरण आहे. आम्ही आतुरतेनं या विजयाची वाट पाहत होते. या खेळाडूंचा आणि व्यवस्थापनाचा खूप अभिमान आहे. त्यांनी आम्हाला खेळण्याचे स्वातंत्र्य आणि तो विश्वास दिला."
''विराटच्या फॉर्मवर कोणालाही शंका नव्हती. त्याच्याकडे असलेली गुणवत्ता आम्हाला माहीत आहे. या सामन्यात कोणीतरी शक्य तितक्या लांब फलंदाजी करायची होती, ती विराटने केली. विराटचा अनुभव कामी आला. मी जसप्रीत बुमराहला इतकी वर्षे खेळताना पाहिले आहे, पण तो हे कसे करतो हे देखील मला माहित नाही. तो एक मास्टरक्लास आहे. तो त्याच्या कौशल्यांचा पाठीराखा करतो आणि तो खूप आत्मविश्वास असलेला मुलगा आहे. हार्दिकने शेवटच्या षटकात गोलंदाजीही केली. चाहत्यांसाठी न्यूयॉर्कमधून बार्बाडोसपर्यंत आम्हाला पाठिंबा देणे विलक्षण आहे. भारतीयांचे आभार,''असेही रोहित म्हणाला.