IND vs SA Live Scorecard : भारतीय संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १७ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. विजय पक्का होताच रोहित शर्मा मैदानावर झोपला आणि जोरजोरात हात आपटून रडताना दिसला. विराट कोहली, हार्दिक, मोहम्मद सिराज, बुमराह, सुर्या सर्वांना आनंदाश्रू अनावर झाले. २००७च्या वर्ल्ड कपमध्ये खेळाडू म्हणून वर्ल्ड कप उंचावणारा युवा रोहित, २०२४ मध्ये कर्णधार म्हणून जेतेपदाचा चषक उंचावताना भावनिक झालेला जगाने पाहिला. भारताच्या ७ बाद १७६ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला ८ बाद १६९ धावाच करता आल्या आणि भारताने ७ धावांनी सामना जिंकला. विराट कोहलीने सामनावीरचा पुरस्कार स्वीकारताना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली. Virat Kohli announces retirement from T20 International Cricket
भारताकडून विराट कोहली व अक्षर पटेल चतुराईने खेळले आणि दोघांच्या ७२ धावांच्या भागीदारीने सामन्याचे चित्र बदलले. अक्षरने ३१ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारांसह ४७ धावा केल्या. शिवम दुबेने २७ धावा चोपल्या. विराट ५९ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७६ धावांवर झेलबाद झाला. भारताने ७ बाद १७६ धावा उभ्या केल्या आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमधील ही सर्वोच्च धावसंख्या ठऱली. प्रत्युत्तरात, आफ्रिकेकडून त्रिस्तान स्तब्स ( ३१), क्विंटन डी कॉक ( ३९) व हेनरिच क्लासेन ( ५२) यांनी दमदार खेळ केला. २४ चेंडूंत २६ धावा हव्या असताना हार्दिकने क्लासेनची विकेट घेतली. बुमराहने टाकलेले १८वे षटक निर्णायक ठरले आणि त्याने मार्को यान्सेनचा ( २) भन्नाट चेंडूवर त्रिफळा उडवला. २०व्या षटकात हार्दिकने टाकलेला पहिलाच चेंडू डेव्हिड मिलरने सीमापार पाठवला होता, परंतु सूर्यकुमार यादवने अप्रतिम झेल घेतला. मिलर ( २१) रडत रडत मैदानाबाहेर गेला. हार्दिकने २०व्या षटकात आणखी एक विकेट घेऊन भारताचा विजय पक्का केला. भारताने ७ धावांनी सामना जिंकला.
सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला...विराट कोहली सामनावीर ठरला: "हा माझा शेवटचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप होता आणि आम्हाला हेच साध्य करायचे होते. एके दिवशी तुम्हाला असे वाटते की तुम्ही धावा करू शकत नाही, मग गोष्टी घडतात. देव महान आहे, आणि मला आज धावा करता आल्या. भारतासाठी शेवटचा ट्वेंटी-२० सामना महत्त्वाचा होता. आम्हाला चषक मिळवायचा होता, बळजबरी करण्यापेक्षा परिस्थितीचा आदर करायचा होता. पुढच्या पिढीने जबाबदारी स्वीकारण्याची वेळ आली आहे, काही अप्रतिम खेळाडू संघाला पुढे नेतील आणि ध्वज उंच फडकावत ठेवतील."
२०११मध्ये सचिन तेंडुलकरला खांद्यावर उचलले गेले होते आता विराटला खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ आली आहे, असे विचारताच तो म्हणाला, "रोहितने नऊ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळले आहेत, हा माझा सहावा आहे. तो यासाठी पात्र आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये मला आत्मविश्वास नव्हता, परंतु आत्ता कृतज्ञ आणि नम्र आहे, भावनांना आवर घालणं कठीण आहे..."