Join us  

India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय

कानपूर कसोटी सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 10:22 AM

Open in App

India won the toss and Rohit Sharma opt to bowl : कानपूर कसोटी सामन्यात रोहित शर्माने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघ तीन फिरकीपटूंसह मैदानात उतरेल, असा अंदाज वर्तवण्यात येत होतो. पण रोहित शर्मानं टॉस जिंकल्यावर कोणताही बदल न करता मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे लोकल बॉय कुलदीप यादवची कानपूरच्या मैदानात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची प्रतिक्षा कायम राहिली आहे. भारताच्या ताफ्यातील फिरकीपटूनं या मैदानात आतापर्यंत  एकही कसोटी सामना खेळलेला नाही.  

टीम इंडियाचा नो चेंज फॉर्म्युला; बांगलादेशच्या संघात दोन बदल  

पहिल्या सामन्यातील पराभवानंतर बांगलादेशच्या संघाने आपल्या ताफ्यात दोन बदल केले आहेत. नाहिद राणा आणि तस्कीन या जोडीला बाकावर बसवण्यात आले असून त्यांच्या जागी तैजुल आणि खलेद यांची  बांगलादेशच्या संघात एन्ट्री झाली आहे. टॉस गमावल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शान्तो याने आम्ही फलंदाजी करणार होतो, असे म्हटले आहे. त्यामुळे बांगलादेशचा संघ या सामन्यात पहिल्या डावात कशी सुरुवात करतो ते पाहण्याजोगे असेल.

अशी आहे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

बांगलादेश संघाची प्लेइंग इलेव्हन

शादमान इस्लाम, झाकीर हसन,  नजमुल हुसैन शान्तो (कर्णधार), मोमीनुल हक, मुशफिकर रहिम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टिरक्षक), मेंहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खलेद अहमद. 

भारतीय संघ क्लीन स्पीप देण्याच्या तयारीत, बांगलादेश  संघासमोर सावरण्याचे आव्हान  

भारतीय संघाने दोन सामन्यांच्या मालिकेतील चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवला होता. पाकिस्तानमधील ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या बांगलादेशच्या संघावर सलामीच्या लढतीत २८० धावांनी पराभूत होण्याची वेळ आली. पहिल्या विजयासह भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून ग्रीन पार्कवर टीम इंडिया आपला विजयी सिलसिला कायम ठेवत मालिका २-० अशी नावावर करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतील आपलं स्थान आणखी भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबांगलादेशरोहित शर्माजसप्रित बुमराह