नवी दिल्ली - कोहलीच्या विराटसेनेने श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत विजयाच्या दिशेने आगेकूच केली आहे. भारताने विजयासाठी दिेलेल्या 410 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या श्रीलंकेची चौथ्या दिवसअखेर 3 बाद 31 अशी बिकट अवस्था झाली असून, भारतीय संघ आता विजयापासून केवळ 7 पावले दूर आहे.
भारताने दिलेल्या 410 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. सहाव्या षटकात मोहम्मद शमीने सदिरा समरविक्रमा (5) याला बाद करत लंकेला पहिला धक्का दिला. या धक्क्यातून सावरत असताना दिवसातील शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने दिमुथ करुणारत्ने (13) आणि सुरंगा लकमल (0) यांच्या विकेट्स काढत पाहुण्या संघाला अडचणीत आणले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा धनंजय डि सिल्व्हा 13 आणि अँजेलो मॅथ्युज 0 धावांवर खेळत होते. सामन्याच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव 373 धावांवर गुंडाळत पहिल्या डावात 163 धावांची भक्कम आघाडी घेतल्यावर भारतीय संघाने दुसऱ्या डावातही दमदार फलंदाजी केली. मुरली विजय (9) आणि अजिंक्य रहाणे (10) हे झटपट माघारी परतल्यावर शिखर धवन (67) आणि चेतेश्वर पुजारा (49) यांनी 77 धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. त्यानंतर विराट कोहली (50) आणि रोहित शर्मा (नाबाद 50) यांनी भराभर धावा जमवून भारताची आघाडी चारशेपार पोहोचवली. अखेर 5 बाद 246 धावांवर भारताने आपला डाव घोषित केला.