गाले, दि. 26 - श्रीलंकेविरुद्ध भारताने दमदार सुरुवात केली आहे. सलामीवीर शिखर धवनने शानदार शतक झळकावले आहे. शतकी खेळीत त्याने 16 चौकार लगावले. धवन आणि चेतेश्वर पूजाराची जोडी मैदानावर आहे. एक विकेट गमावून भारताच्या 150 पेक्षा जास्त धाव झाल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताला 27 धावांवर पहिला झटका बसला. सलामीवीर अभिनव मुकुंदला (12) धावांवर प्रदीपने डीकवेलाकरवी झेलबाद केले.
गेल्या काही महिन्यांपासून कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध प्रारंभ होत असलेल्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत वर्चस्व कायम राखण्यास उत्सुक आहे. याच मैदानावर भारताला दोन वर्षांपूर्वी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता; पण त्यानंतर भारतीय संघाने कामगिरीत सातत्य राखताना जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.
विराट कोहली अँड कंपनी २०१५ मध्ये गाले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्यास उत्सुक असेल. त्या वेळी चौथ्या दिवशी १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव ११२ धावांत संपुष्टात आला होता.तेव्हापासून आतापर्यंत बरेच काही बदलले आहे. युवा व आक्रमक कोहली आता परिपक्व झाला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली २०१६-१७च्या मोसमात वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि आॅस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध १७ पैकी १२ कसोटी सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सहभागी होताना भारतीय संघ त्याच आत्मविश्वासाने उतरणार असून, आपल्या नव्या मोसमाची सुरुवात करणार आहे. त्याचसोबत रवी शास्त्री दुसºयांदा भारतीय संघासोबत महत्त्वाच्या पदावरील नवी इनिंग सुरू करतील. गेल्या पाच दिवसांपासून शास्त्री संघासोबत आहेत. त्यामुळे अनिल कुंबळे यांनी पद सोडणे आणि प्रशिक्षक निवड प्रक्रिया याबाबतच्या नाट्यमय घटनाक्रमाला खेळाडू विसरले असतील, अशी आशा आहे.
शास्त्री आता मुख्य प्रशिक्षक म्हणून संघासोबत जुळले आहेत, तर भरत अरुण गोलंदाजी प्रशिक्षकपदाची भूमिका सांभाळत आहेत. त्यामुळे सपोर्ट स्टाफमध्ये समतोल साधला गेल्याचे भासत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शास्त्री यांची नजर आता गाले स्टेडियममध्ये सकारात्मक निकाल देण्यावर केंद्रित झाली आहे. या मैदानावर नेहमीच पाहुण्या संघाला संघर्ष करावा लागला आहे. त्या वेळी शास्त्री संघाचे संचालक होते. त्यांनी कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या दुसºया कसोटीपूर्वी संघाचे मनोधैर्य उंचावले होते. त्याचा लाभही झाला होता. भारताने त्या मालिकेत २-१ ने विजय मिळवला होता.
या युवा संघाने त्या वेळी विदेशात प्रथमच विजयाची चव चाखली होती. २०१५-१६ व २०१६-१७ याची तुलना करताना गालेतील पराभवानंतर भारताने २३ कसोटी सामने खेळले. केवळ एक सामना (आॅस्ट्रेलियाविरुद्ध पुणे येथे) गमावला. सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने हा पराक्रम केला आहे. भारताची बेंच स्ट्रेंथ मजबूत आहे. के. एल. राहुल तापामुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार असला, तरी संघव्यवस्थापनाला चिंता भेडसावत नाही.
कर्नाटकच्या या फलंदाजाने खांद्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर, आताच पुनरागमन केले आहे. मार्च महिन्यानंतर त्याला एकही सामना खेळता आला नव्हता; पण कोलंबोमध्ये दोनदिवसीय सराव सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. राहुलच्या अनुपस्थितीत शिखर धवन व अभिनव मुकुंद यांना सलामीला खेळविण्याचा पर्याय आहे. दौ-याच्या सुरुवातीला या दोन फलंदाजांमध्ये एका स्थानासाठी चुरस होती.धवन एकेकाळी पहिल्या पसंतीचा सलामीवीर होता; पण गेल्या वर्षी विंडीज दौ-यानंतर तो तिस-या पसंतीचा सलामीवीर फलंदाज ठरला आहे. त्यानंतर आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याला संघातून वगळण्यात आले. मुकुंद आॅस्ट्रेलियाविरुद्ध बंगळुरू कसोटीत खेळला होता; पण दोन डावांत त्याला केवळ १६ धावा करता आल्या. त्यामुळे त्याच्याकडे स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे..