रोहित नाईकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘शार्दूल ठाकूर याला भारतीय संघात स्थान मिळाले असते, तर नक्कीच त्याचा फायदा डब्ल्यूटीसी अंतिम लढतीत झाला असता. इंग्लंडमधील हवामान आणि खेळपट्ट्या पाहता त्याचा अष्टपैलू खेळ प्रभावी ठरला असता,’ असे मत भारताचा वेगवान गोलंदाज व अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर याचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम लढतीत शार्दूलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता. याविषयी लाड म्हणाले की, ‘खरं म्हणजे डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारताने दोन फिरकीपटू खेळवायला नको होते. इंग्लंडमधील परिस्थिती पाहता वेगवान गोलंदाज अष्टपैलूंची गरज होती आणि शार्दूल त्यासाठी योग्य होता. शार्दूलकडे वेग व स्विंगही आहे. शिवाय, तो फलंदाजीही चांगल्या प्रकारे करतो आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपण हे पाहिलेच आहे. त्यामुळे त्याच्या समावेशाने फरक पडला असता; पण शेवटी अंतिम निर्णय संघ व्यवस्थापनाचा असतो.’
‘इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत, मात्र शार्दूल प्रभावी ठरेल,’ असा विश्वासही लाड यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,‘शार्दूलच्या गोलंदाजीत विविधता असून तो चेंडूला चांगली दिशा देतो. तो लाल चेंडूच्या क्रिकेटसाठी प्रभावी स्विंग गोलंदाज आहे. सफेद चेंडूच्या क्रिकेटमध्ये त्याला बरीच मेहनत घ्यावी लागली; पण त्याआधीपासून तो लाल चेंडूने यशस्वी ठरला आहे. त्याने रणजी क्रिकेटमधील यशाच्या जोरावरच भारतीय संघात स्थान मिळविले. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास उंचावण्यास आणखी मदत झाली, तर येणाऱ्या काळात तो नक्कीच हुकमी गोलंदाज बनेल.’
लाड यांच्या मार्गदर्शनाखालीच शार्दूल व ‘हिटमॅन’ रोहित शर्मा घडले. आता आगामी इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोघांना भारताच्या अंतिम संघात स्थान मिळाल्यास एकाच वेळी लाड यांचे दोन शिष्य भारतासाठी कसोटी खेळताना दिसतील. ‘असे झाल्यास एक प्रशिक्षक म्हणून ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट ठरेल,’ असेही लाड यांनी सांगितले.
रोहितचे स्थान धोक्यात नाही!n अंतिम सामन्यातील पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीने संघातील बदलाचे संकेत दिले होते. मात्र, याचा रोहित शर्माच्या स्थानावर परिणाम होणार नसल्याचा विश्वास लाड यांनी व्यक्त केला. ते म्हणाले,‘रोहितने अंतिम सामन्यात कसोटी क्रिकेटला साजेशी खेळी केली. पहिल्या डावात तो चुकीने बाद झाला. n दुसऱ्या डावातही त्याचा चेंडू सोडण्याचा अंदाज चुकला आणि तो परतला. त्यामुळे अनुभवाच्या जोरावर आणि चुका सुधारून तो नक्कीच इंग्लंडविरुद्ध यशस्वी ठरेल, असा विश्वास आहे.’