नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने मंगळवारी पाकिस्तानच्या बालाकोट येथे एअर सर्जिकल स्ट्राईक करताना दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर दिले. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. अशातच पाकिस्तानकडून आगळीक सुरुच होती, त्याला प्रत्युत्तर म्हणून मंगळवारी भारतीय हवाई दलाने घरात घुसून पाकिस्तानला धडा शिकवला. बालोकेट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने 1000 किलो वजनाची स्फोटके टाकून हा बॉम्बहल्ला केला. त्यात जवळपास 300 हून अधिक दहशतवादी ठार झाले. भारतीय हवाई दलाच्या या शौर्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला जशास तसे उत्तर देण्याची धमकी दिली. त्याला भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं सडेतोड उत्तर दिले आणि पाक पंतप्रधानांना खडे बोल सुनावले.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या सुत्रधारांचा खात्मा केल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला दणका दिला आहे. सोमवारी मध्यरात्री तीन ते साडेतीनच्या दरम्यान 'मिराज2000' विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केली. 'मिराज2000' च्या 12 विमानांनी जैश ए मोहम्मदचं अल्फा-3 नियंत्रण कक्ष आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. विशेष म्हणजे पाकिस्तानला कारगिल युद्धात धडा शिकवणाऱ्या बी. एस. धनोआ यांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 12 दिवसांपूर्वी जैशे-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं पुलवामा येथे केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते.
भारतीय हवाई दलाच्या कारवाईनंतर पाकिस्तानच्या नॅशनल सिक्युरिटी कमिटीनं पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली एक तातडीची बैठक बोलावली. बैठकीत पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी लष्कर आणि नागरिकांना कोणत्याही परिस्थितीला समोरं जाण्यासाठी तयार राहा, असा सल्ला दिला आहे. तसेच आता वेळ आणि स्थळ पाकिस्तान ठरवेल; अशी धमकीही इम्रान खान यांनी भारताला दिली आहे.
पाक पंतप्रधानांच्या या धमकीचा गौतम गंभीरनं चांगलाच समाचार घेतला. तो म्हणाला,'' वेळ आणि ठिकाण आम्ही ठरवूच शिवय तुमचे नशीबही आम्हीच ठरवणार आहोत.''