भारतीय महिला संघातील स्टार महिला क्रिकेटर दीप्ती शर्मा सध्या चर्चेत आहे. धार्मिक गोष्टीवर श्रद्धा बाळगणारी ही क्रिकेटर नुकतीच प्रेमानंद महाराज यांच्या प्रवचन कार्यक्रमात स्पॉट झाली. भक्तीभावाने या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर तिने प्रेमानंद महाराजांना काही प्रश्नही विचारले. ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. महिला क्रिकेटरने संघाच्या अंतिम लढतीतील पराभवापासून ते फॉर्मशी झगडत असताना नकारात्मकतेचा सामना कसा करावा? या धाटणीतील प्रश्न विचारले होते. यावर तिला प्रेमानंद महाराजांनी साधा सोपा मंत्रही जपण्यास सांगितले.
भारतीय क्रिकेटरनं प्रेमानंद महाराजांकडून घेतला या गोष्टीचा सल्ला
दीप्तीनं जे काही प्रश्न विचारले ते करिअर आणि संघाच्या अंतिम सामन्यातील पराभवासंदर्भातील होते. प्रयत्न करूनही चांगली कामगिरी होत नसेल तर नकारात्मक भावना निर्माण होते. या परिस्थितीत चांगल्या कामगिरीसाठी काय करायला हवे? हा तिच्या प्रश्नांपैकी एक प्रश्न होता. या वैयक्तिक प्रश्नाशिवाय तिने सातत्यपूर्ण चांगल्या कामगिरीनंतर फायनलमध्ये आमच्या संघाच्या पदरी पराभव का येतो? असा प्रश्न तिने प्रेमानंद महाराजांना विचारला आहे.
संयम अन् सराव दोन शब्दांत मिळालं उत्तर
प्रेमानंद महाराज यांनी भारतीय महिला क्रिकेटरला खास मंत्र दिला. ते म्हणाले की, संयमी व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतो. बऱ्याचदा यश मिळाल्यावर आपण संयमावरील नियंत्रण हरवून बसतो. संयम आणि सराव या दोन गोष्टींचा समतोल राखला तर कोणीच आपल्याला पराभूत करू शकणार नाही. यासाठी रोज सराव गरजेचा आहे. खबरदारी, संयम आणि सराव यावरून लक्षविचलित झाले तर चूक होण्याची शक्यता अधिक वाढते.
परदेशातील लीग स्पर्धा गाजवून परतलीये मायदेशी
दीप्ती शर्मा महिला द हंड्रेड टुर्नामेंटमध्येही खेळताना दिसली होती. इंग्लंडमधील या स्पर्धेत तिने दमदार कामगिरीही केली. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत ती सातव्या क्रमांकावर राहिली. याशिवाय तिने ८ विकेट्सही आपल्या खात्यात जमा केल्या होत्या. १८ धावा खर्च करून ३ विकेट्स ही तिची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी होती. परदेशी लीग स्पर्धा गाजवल्यानंतर दीप्तीनं मायदेशी परतल्यावर अध्यात्मात मग्न होण्याला पसंती दिल्याचे दिसते.